
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत डॉ. आंबेडकरांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसने या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शहा यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राजद, डावे पक्ष आणि शिवसेना-उबाठा यांनी शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यामुळे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहा यांच्या बचावासाठी पुढे यावे लागले.
शहांविरुद्ध तृणमूलचा हक्कभंग प्रस्ताव
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी शहा यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. तर दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर जमून ‘शहा माफी मांगो, शहा शर्म करो’, अशी घोषणाबाजी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनीही शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डॉ. आंबेडकरांचा अवमान देश सहन करणार नाही, शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी गांधी यांनी केली. शहा यांनी माफी मागावी या मागणीसाठी राहुल, खर्गे, इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. डॉ. बाबासाहेब घटनाकार आहेत, या महान व्यक्तीने देशाला दिशा दिली आहे, त्यांचा अवमान देश सहन करणार नाही, शहा यांनी माफी मागावी, असे राहुल आणि प्रियांका यांनी म्हटले आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. ज्यांचा मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही शहा यांच्यावर टीका केली. भाजप आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला, अशोकचक्राला त्यांचा विरोध होता. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही. म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला.
कामकाज तहकूब
दरम्यान, अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार गदारोळ माजविला आणि शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत सर्व खासदारांनी डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र हातात घेत संसद भवनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मोदी स्वत: पुढे सरसावले आणि त्यांनी काँग्रेसला चार बोल सुनावले. डॉ. आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि अनुसूचित जाती-जमातीचा अपमान करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने पाहिले आहे, असे सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, एका पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला. संसदेत अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा आणि अनुसूचित जाती-जमातीकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. शहा यांनी दाखवलेल्या तथ्यामुळे काँग्रेसची बोलती बंद झाली. त्यामुळेच आज ते नौटंकी करत आहेत. हे दु:खद असले तरी लोकांना सत्य माहिती आहे, असे ते म्हणाले.
आम्ही आज जे काही आहोत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. आमच्या सरकारने मागील एका दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता मेहनत घेतली आहे. कुठलेही क्षेत्र घ्या, मग २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे असेल; एससी, एसटी कायदा मजबूत करणे असेल, आमच्या सरकारने स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना यासारखे अनेक कार्यक्रम हाती घेतले. या सर्व योजनांमुळे गरीब आणि वंचित घटकांना न्याय मिळाला, असे मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसने एकदा नव्हे दोनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. पंडित नेहरू यांनी त्यांच्याविरोधात प्रचार करत आंबेडकरांचा पराभव प्रतिष्ठेचा केला होता. काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्नही देण्यास नकार दिला होता. त्यांचे छायाचित्र संसदेत सन्मानाने लावण्याचीही काँग्रेसची इच्छा नव्हती. जर काँग्रेसला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे वाटत असेल की त्यांची चुकीची कामे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान लपवू शकतात तर ही त्यांची मोठी चूक आहे. घराणेशाहीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समूहाचा अपमान करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने पाहिले आहे, असे सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.
मोदींनी आपल्या पोस्टमध्ये अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा अवमान केल्याचा काळा इतिहासच संसदेत शहा यांनी उघड केला. शहा यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी हे नाटक सुरू केले आहे. पण दुर्दैवाने लोकांना सत्य काय आहे याची पूर्ण कल्पना आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले.
अमित शहा काय म्हणाले?
अमित शहा मंगळवारी राज्यसभेत म्हणाले की, आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल. या विधानाआधी शहा म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.
बचावासाठी नरेंद्र मोदी सरसावले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत संसदेत बुधवारी काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. डॉ. आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शहा यांना घेरल्याचे पाहताच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहा यांच्या बचावासाठी सरसावले.
विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर चर्चा करण्याची विरोधकांनी केलेली मागणी फेटाळण्यात आल्यानंतर बुधवारी विधान परिषदेतून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
राज्यसभेत शहा यांनी जे वक्तव्य केले त्यावरून भाजप आणि रा. स्व. संघाला डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल तिरस्कार असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसने केला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला सत्तारूढ सदस्यांनी विरोध केला. संसदेत जे घडले त्यावर या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, विरोधक या प्रश्नावर राजकारण करीत आहेत, असे उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर विरोधी सदस्य सभागृहातील मोकळ्या जागेत आले आणि त्यांनी घोषणाबाजी करून सभात्याग केला.