

नवी दिल्ली : देशातील नक्षलवादाची समस्या गंभीर असल्याचे मान्य करूनही काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी "काहीही" केले नाही, असा ठपका ठेवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. तसेच, छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तरमधून आता माओवाद्यांचा जवळपास नायनाट झाला असल्याचे त्यांनी जाहीर केले.
अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले. शस्त्रे खाली ठेवणाऱ्यांना सरकार निश्चितच मदत करेल, मात्र शस्त्रांनी हिंचा घडविणाऱ्यांना आता कठोर उत्तर दिले जाईल. नक्षलवाद्यांनी आता शस्त्रे खाली ठेवावी, अन्यथा सरकार आता गोळीला गोळीनेच उत्तर देईल, असा इशाराही यावेळी शहा यांनी दिला.
देशाला डाव्या विचारसरणीच्या अतिरेकापासून मुक्त करण्याचे प्रयत्न' या विषयावरील चर्चेला उत्तर देताना शाह बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नक्षलवाद हे काश्मीर आणि ईशान्येकडील समस्यांपेक्षा मोठे आव्हान असल्याचे मान्य केले होते, मात्र तरीही काँग्रेसने त्याबद्दल काहीही केले नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.
'नक्षलमुक्त भारत' हेच उद्दिष्ट
उद्या, ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरली. नक्षलमुक्त भारत ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे; कोणताही संशोधक हे मान्य करेल. शस्त्र हातात घेणाऱ्यांना याची किंमत मोजावीच लागेल. अन्यायावर उपाय संविधानात आहे, शस्त्रात नाही, असेही शहा म्हणाले.
बस्तरमधील बदललेले चित्र
शहा म्हणाले की, लाल दहशतीच्या सावलीमुळे बस्तरचा विकास थांबला होता, पण आता ते सावट दूर होत असून बस्तरचा विकास होत आहे. प्रत्येक गावात शाळा आणि रेशन दुकाने उघडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (विशेषतः कोब्रा आणि सीआरपीएफ), सुरक्षा यंत्रणा, छत्तीसगड पोलीस, डीआरजी जवान आणि स्थानिक आदिवासी जनतेला दिले.
मूलभूत सुविधांचा अभाव
काँग्रेसने ६० वर्षांत आदिवासींना घरे, पाणी, शाळा किंवा बँकिंग सुविधा दिल्या नाहीत. विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या कार्यकाळातील चुकांकडे बघा.
लाल कॉरिडॉरचा विस्तार
एकेकाळी देशातील १२ राज्ये 'लाल कॉरिडॉर'मध्ये रूपांतरित झाली होती, जिथे कायद्याचे राज्य नव्हते. सुमारे १२ कोटी जनता वर्षानुवर्षे गरिबीत राहिली आणि नक्षलवादी हिंसेत ५,००० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २०,००० लोक मारले गेले. या सर्वासाठी जबाबदार कोण, ७५ वर्षांपैकी तुम्ही ६० वर्षे राज्य केले, मग आदिवासी आजही विकासापासून वंचित का आहेत, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला. आदिवासींचा खरा विकास आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे त्यांनी सांगितले.