

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भाजपचा जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप सत्तेत आल्यास पहिल्या सहा महिन्यांत राज्यात 'समान नागरी कायदा' (यूसीसी) लागू केला जाईल, अशी मोठी घोषणा शहा यांनी यावेळी केली.
बंगाली मुख्यमंत्रीच होणार
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, या चर्चेवर शहा यांनी पडदा टाकला. ते म्हणाले, भाजप हा घराणेशाही चालवणारा पक्ष नाही, जेथे आत्यानंतर पुतण्या गादीवर बसेल. मी बंगालच्या जनतेला आश्वासन देतो की, भाजपचा मुख्यमंत्री हा बंगालचा सुपुत्र आणि येथीलच नागरिक असेल.
व्हिडीओ वादावर स्पष्टीकरण
तृणमूलने प्रसिद्ध केलेल्या हुमायूं कबीर यांच्या व्हिडीओंवर शहा म्हणाले की, कबीर आणि भाजप हे दोन विरुद्ध ध्रुव आहेत. अशा लोकांशी हातमिळवणी करण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसणे पसंत करू. ममता बॅनर्जी अशा प्रकारचे अनेक खोटे व्हिडीओ तयार करण्यात माहीर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसकडून तुष्टीकरण
प्रत्येक नागरिकासाठी एकच कायदा असेल. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे दशकांपासून याची अंमलबजावणी रखडली होती. जेथे आमची सरकारे आहेत तिथे आम्ही हा कायदा आणला आहे, बंगालमध्येही तो लागू करू असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.