
कोलकाता : मुस्लिम मतपेढीला खूश करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘वक्फ सुधारणा’ कायद्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोध करत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली.
ते म्हणाले की, मुस्लिम मतपेटीचे समर्थन करून ममता बॅनर्जी या देशातील आई-बहिणींचा अपमान करत आहेत. पश्चिम बंगालच्या पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील आया-बहिणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा त्यांनी दिला.
‘विजय संकल्प कार्यक्रमात’ पक्षकार्यकर्त्यांशी बोलताना शहा म्हणाले की, जेव्हा पहलगाम हल्ल्यात पश्चिम बंगालच्या पर्यटकांचा मृत्यू झाला तेव्हा ममता बॅनर्जी गप्प बसल्या. मुर्शिदाबाद येथील दंगलीला राज्य सरकारचे समर्थन होते. गृह मंत्रालयाने बीएसएफ तैनात करण्याचे ठरवले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ते होऊ दिले नाही, अशी टीका त्यांनी केली.
शहा म्हणाले की, ‘वक्फ सुधारणा’ कायद्यावरून मुर्शिदाबादला दंगली झाल्या. त्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होते. यात तीन जणांचा मृत्यू झाला. बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे ‘वक्फ’ सुधारणा कायद्याच्या विरोधात ते आहेत. तृणमूल काँग्रेस बांगलादेशातून होणाऱ्या अवैध घुसखोरीला पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या नागरिकांसाठी बंगालची सीमा उघडली आहे. पश्चिम बंगाल सरकारने बीएसएफला आवश्यक जमीन दिली नाही. बीएसएफला जमीन मिळाल्यास आम्ही घुसखोरी रोखू शकतो. मात्र, तृणमूल असे करणार नाही, असे शहा यांनी सांगितले.