
नवी दिल्ली : भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षपदाच्या यशस्वीतेमागे महत्त्वाची भूमिका बजावणारे अमिताभ कांत यांनी आपल्या ‘जी-२० शेर्पा’पदाचा राजीनामा दिला आहे. केरळ केडरचे १९८० च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या अमिताभ कांत यांची जुलै २०२२ मध्ये भारताचे ‘जी-२० शेर्पा’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपल्या ४५ वर्षांच्या दीर्घ सरकारी सेवेत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
अमिताभ कांत यांनी लिंक्डइनवर 'माय न्यू जर्नी' या शीर्षकाच्या पोस्टमध्ये आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. भारताचे ‘जी-२० शेर्पा’ म्हणून बहुपक्षीय वाटाघाटींचे नेतृत्व करणे हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, असे त्यांनी नमूद केले.
अमिताभ कांत यांनी २०२३ मध्ये भारताने सांभाळलेल्या ‘जी-२०’ अध्यक्षपदाचे वर्णन 'आतापर्यंतचे सर्वात समावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक' असे केले. त्यांनी सांगितले की, जागतिक भू-राजकीय आव्हाने असतानाही, नवी दिल्लीने नेत्यांच्या घोषणेवर एकमत साधले. यामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, बहुपक्षीय आर्थिक सुधारणा, हवामान वित्त आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या प्रमुख विकासात्मक प्राधान्यांवर जगाचे लक्ष केंद्रित करण्यात आले.