''हे बघून संत गाडगेबाबा विसरून गेलो', राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेच्या व्हिडीओवरून अमृता फडणवीस ट्रोल

स्वच्छता मोहीमेचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यावरून अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.
''हे बघून संत गाडगेबाबा विसरून गेलो', राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेच्या व्हिडीओवरून अमृता फडणवीस ट्रोल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात, आणि अनेकदा त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे अमृता फडणवीस नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना, त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेऊन साफसफाई केली होती. त्या साफसफाईच्या माध्यमांतून त्यांनी जनतेला मंदिरं स्वच्छ करण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक झावबा राम मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी अमृता फडणवीस यांची लेक दिवीजा आणि अभिनेते जॉकी श्रॉफ यांनीही या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहीमेचा एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यावरून अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.

साफसफाई करण्याचं केवळ नाटक करत असल्याचं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ''हे बघून आमचे संत गाडगेबाबा विसरून गेलो'', "इतक्या चांगल्या अभिनयासाठी तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळेल", "यांनी कधी घरातही झाडू मारला नसेल", "स्वच्छ जागेलाच का परत साफ करतात", अशा बऱ्याच प्रतिक्रिया व्हिडिओखाली दिसत आहेत. दुसरीकडे, काही नेटकरी अमृता फडणवीसांचं कौतुकही करीत असून जय श्री रामच्या कमेंट केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in