
अमूलने दिवाळी सणापूर्वी फुल क्रीम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. हा निर्णय गुजरात वगळता देशातील सर्व राज्यांना लागू असेल. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही माहिती दिली आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, अमूल दुधाने ही दरवाढ जाहीर केली आहे.
अमूल दुधाने फुल क्रीम असलेल्या म्हशीच्या दुधात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाचे दर 61 रुपयांवरून 63 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गायीचे दूध आता 53 रुपयांवरून 55 रुपये प्रतिलिटर होणार आहे. गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे येथील दर स्थिर ठेवण्यात आल्याचा अंदाज आहे. यापूर्वी मार्च आणि ऑगस्ट महिन्यात दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात अमूल गोल्ड, शक्ती, ताज्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. लम्पि रोगामुळे दूध उत्पादन व वितरणावर परिणाम झाला आहे. हा रोग म्हशी, गायी तसेच बैलांवर होत आहे. त्यामुळे राजस्थान, गुजरात, पंजाबमधील दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुधाचे उत्पादन ४५ टक्क्यांनी घटले आहे. या राज्यांसोबतच देशातील १५ राज्यांमध्ये लम्पि रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.