

नवी दिल्ली : दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या आर्थिक वर्षात अमूलच्या एकूण उलाढालीत ११ टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीने १ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये 'अमूल' ब्रँडची एकूण उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
दुग्ध क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अमूल'ने रविवारी सांगितले की, २०२४-२५ मधील ९०,००० कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत अमूल ब्रँडच्या एकूण महसुलात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमूल ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या फेडरेशनची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात ७३,४५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या पूर्वीच्या आर्थिक वर्षात ही उलाढाल ६५,९११ कोटी रुपये इतकी होती. यात यंदा ११.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अमूल उत्पादनांच्या जगभरात वार्षिक २४ अब्ज (२४ बिलियन) हून अधिक पॅक्सचे वितरण होते.
दूध पिता है इंडिया...
फेडरेशनने म्हटले आहे की, १,२०० हून अधिक उत्पादनांची मोठी श्रेणी, विस्तीर्ण वितरण जाळे आणि आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःमध्ये वेगाने केलेले बदल यामुळे ही मोठी झेप घेणे शक्य झाले आहे.
अमूल ब्रँड अंतर्गत १८ जिल्हा सहकारी संस्था जिल्ह्यात उत्पादने विकतात. या १८ जिल्हा सहकारी संस्थांची उलाढाल फेडरेशनच्या महसुलात समाविष्ट नसते.
प्रमुख पदाधिकारी म्हणतात की...
अशोकभाई चौधरी (अध्यक्ष, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) : १ लाख कोटी रुपयांची ब्रँड उलाढाल पार करणे हा कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या ३६ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा पुरावा आहे.
गोवर्धनभाई धामेलिया (उपाध्यक्ष, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) : १ लाख कोटींच्या टप्प्यापर्यंतचा आमचा प्रवास हा सहकारी भावनेचा विजय आहे. आमचे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर नेऊन आम्ही हे सिद्ध करत आहोत की 'अमूल मॉडेल' हे आर्थिक लोकशाहीचा एक शाश्वत आराखडा आहे.
जयेन मेहता (व्यवस्थापकीय संचालक, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) : संस्था जागतिक स्तरावर आपला विस्तार करत नाही तर शेतकरी मालकीची संस्था आधुनिक जगात काय साध्य करू शकते, याची नवी व्याख्याही लिहित आहे. तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापाराचा फायदा उत्पादकांच्या हातापर्यंत पोहोचेल याची आम्ही खात्री करत आहोत.
अमूलची व्याप्ती
शेतकरी संख्या : ३६ लाख
(शेतकरी मालक असलेली जगातील सर्वात मोठी दुग्ध सहकारी संस्था)
जागतिक अस्तित्व : ५० हून देश (विदेशात अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री)
दूध संकलन : दररोज ३.१० कोटी लिटर
वितरण : दूध, लोणी, चीज, तूप, आइस्क्रीम