भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

टंकारा (गुजरात) : भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. आर्य समाजाच्या शाळा यासाठी केंद्र बनल्या आहेत. देश आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे तिचा विस्तार करत आहे. या प्रयत्नांशी समाजाला जोडण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोक गुलामगिरीत आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले असताना भारतीय समाजाला वेदांकडे परत जाण्याचे आवाहन करणाऱ्या समाजसुधारकाचे मोदींनी कौतुक केले.

मोदी म्हणाले की, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म अशा वेळी झाला, जेव्हा भारतीय गुलामगिरीत आणि सामाजिक दुष्टचक्रात अडकले होते. स्वामी दयानंदजींनी तेव्हा देशाला सांगितले की, आपल्या रूढीवादी विचारांनी आणि अंधश्रद्धांनी देश व्यापला आहे. आपली वैज्ञानिक विचारसरणी कमकुवत केली आहे. या सामाजिक दुष्कृत्यांनी आपल्या एकतेवर हल्ला केला आहे. समाजातील एक वर्ग भारतीय संस्कृती आणि अध्यात्मापासून सतत दूर जात आहे. अशा काळात स्वामी दयानंदजींनी वेदांकडे परत जाण्याचे आवाहन केले, असेही त्यांनी सांगितले.

महर्षी दयानंद हे केवळ जागतिक ऋषीच नव्हते तर राष्ट्रीय चेतनेचे ऋषीही होते, ज्यावेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आमच्या सामाजिक दुष्कृत्यांचा मोहरा म्हणून वापर करून आमच्या लोकांना हीन बनवण्याचा प्रयत्न केला आणि काही लोक सामाजिक दुष्कृत्यांचा हवाला देऊन त्यांची राजवट योग्य ठरवत होते, तेव्हा दयानंद सरस्वतींच्या आगमनाने अशा कारस्थानांना धक्का बसला, असेही मोदी म्हणाले.

आर्य समाजाच्या या संस्थापकाने वेदांवर तार्किक स्पष्टीकरण दिले. सनातनींच्या रूढींवर खुलेपणाने हल्ला केला आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप काय आहे, हे स्पष्ट केले. त्याचा परिणाम असा झाला की, समाजात आत्मविश्वास परत येऊ लागला. लोक वैदिक धर्म जाणून घेऊ लागले आणि त्याच्या शिकवणींशी जोडू लागले. लाला लजपत राय, राम प्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांसारखे क्रांतिकारक उभे राहिले ज्यांचा आर्य समाजावर प्रभाव होता, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in