
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील वारसदाराने भगवंताशी एकरूप होण्याच्या भारतीय मार्गाचा अवलंब करत एक अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांनी आपल्या पूर्वजांचे गाव असलेल्या जामनगर येथून द्वारकापर्यंतची १७० कि.मी.ची पदयात्रा सुरू केली आहे.
अनंत अंबानी यांनी २९ मार्च रोजी प्रवास सुरू केला असून दररोज सुमारे २० किलोमीटर चालत आहेत. विशेष म्हणजे ते तब्बल सात तास रात्रभर चालत आहेत. ८ एप्रिल रोजी म्हणजे त्यांच्या ३० व्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर ते द्वारका येथे पोहोचणार आहेत.
या प्रवासात, अंबानींना श्रद्धा आणि सद्भावनेचा अनुभव येत असून काही लोकांनी त्यांच्यासोबत काही अंतर चालून त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. या पदयात्रेत काहींनी त्यांना भगवान द्वारकाधीश यांची चित्रे दिली, तर काहींनी त्यांच्या घोड्यांसह येऊन एकत्र छायाचित्रदेखील काढले.
अनंत अंबानी कुशिंग सिंड्रोम- एक दुर्मिळ हार्मोनल विकार, स्थूलपणा, अस्थमा आणि फुफ्फुसविकार अशा आरोग्य समस्यांनी ग्रस्त असतानाही त्यांनी पदयात्रा आरंभली आहे. म्हणूनच ती जनसामान्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.