
पोर्ट ब्लेअर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे भारतीय हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.
हवामानातील या बदलत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बंदरांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, २३ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘निकोबार बेटांवर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस (७-११ सेमी) पडण्याची शक्यता आहे. २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर एक-दोन ठिकाणी वादळी वारे (४०-५० किमी प्रतितास) आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे,’ असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच २४ आणि २५ ऑक्टोबरलाही एक-दोन ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘२२ ते २३ ऑक्टोबरदरम्यान अंदमान समुद्रात ३५-४५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, तर अन्य विभागात ५५ किमी प्रतितास वेग गाठणारे झोत अनुभवायला मिळू शकतात. पुढील पाच दिवस समुद्रस्थिती खडतर राहण्याची शक्यता असल्याने, मच्छीमारांना २४ ऑक्टोबरपर्यंत अंदमान समुद्रात आणि अंदमान-निकोबार किनाऱ्यावर मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या काळात लाटांच्या उंचीमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोटचालक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने नौकानयन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व मनोरंजनात्मक क्रीडा काळजीपूर्वक पार पाडाव्यात, असे सांगितले आहे.
पर्यटक आणि सामान्य नागरिकांना समुद्रात जाणे टाळण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सुरक्षा सूचना पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.