
नवी दिल्ली : पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता भारत आणखी मोठी तयारी करत आहे. अंदमानच्या समुद्रातील एअर स्पेस दोन दिवसांसाठी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासून ते २४ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ही हवाई क्षेत्राची बंदी राहणार आहे. ‘नोटाम’ जारी केल्याने भारत कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी करतोय याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
भारताच्या ‘आकाश’ आणि ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानात हाहाकार उडवून दिला होता. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच पाकिस्तानचे ११ हवाई तळही उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानची हवा निघाली होती. पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचे प्रयत्न केले, परंतु ते सर्व भारताच्या शक्तिशाली ‘सुदर्शनचक्र’ हवाई सुरक्षा प्रणालीने फोल ठरविले होते. आता भारताने जारी केलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीचे हे क्षेत्रफळ ५०० किमीएवढे विस्तारलेले आहे. तसेच सर्व उंच स्तरांवरील नागरी विमानांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे इथे भारत क्षेपणास्त्र किंवा शस्त्रास्त्र प्रणालीची चाचणी करण्याची शक्यता आहे.
नोटाम म्हणजे काय?
'नोटाम' म्हणजे ‘नोटीस टू एअरमेन’. या काळात कोणतेही विमान या भागातून नेण्यास मनाई असते. तसेच जरी कोणी परवानगी मागितली तरीही ती दिली जात नाही. चाचणीदरम्यान कोणतीही हानी होऊ नये म्हणून संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देणारी ही सूचना वैमानिकांना जारी केली जाते. यापूर्वीही असे ‘नोटाम’ जारी करण्यात आले आहेत. परंतु, आताचा ‘नोटाम’ चार दिवसांच्या पाकिस्तानविरोधातील युद्धामुळे जास्त चर्चेत येत आहे.
‘नोटाम’चे स्थान आणि काही तपशील क्षेपणास्त्र किंवा शस्त्र प्रणाली चाचणीचे संकेत म्हणून समजले जाऊ शकतात. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अंदमानमध्ये हवेतून मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. तसेच मार्च २०२२ मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.