आंध्रमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या धावत्या बसला आग लागल्याने २० हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.
आंध्रमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू
आंध्रमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Published on

कुर्नूल : आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या धावत्या बसला आग लागल्याने २० हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

कुर्नूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. सदर बस हैदराबादहून बंगळुरूकडे ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसताच बसला आग लागली आणि काही क्षणातच या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला. आग लागल्यानंतर बसचा दरवाजा जाम झाला आणि तो उघडता आला नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ११ मृतदेहांची ओळख पटली असून, ९ मृतदेहांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. बसला आग लागताच बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बारा प्रवाशांनी आपला जीव वाचवला, परंतु त्यापैकी अनेकजण भाजले आहेत. मात्र, उर्वरित प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे ते आगीत अडकून होरपळले.

या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून मदतीचे आश्वासन दिले आहे.

समिती स्थापन

आंध्र प्रदेशमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांच्या मृत्यू झाला त्या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये परिवहन, रस्ते आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राजस्थानच्या घटनेची पुनरावृत्ती

कुर्नूलमधील ही दुर्घटना काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये झालेल्या एका बस अपघाताची आठवण करून देते. १४ ऑक्टोबरला जैसलमेर-जोधपूर बसला आग लागून तीन मुलांसह २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एसी प्रणालीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या दोन्ही घटनांमुळे प्रवासादरम्यान बसमधील सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in