Video : मतदान केंद्रावरच भिडले आमदार आणि मतदार, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...

MLA Slaps Voter : एका आमदारानं मतदान केंद्रावरच मतदाराला कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आमदार आणि मतदार भिडले
आमदार आणि मतदार भिडले@Shehzad_Ind - X

अमरावती: लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासमवेत १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही होत आहे. दरम्यान येथील एका आमदारानं मतदान केंद्रावरच मतदाराला कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP पक्षाचे आमदार व्हीएस शिवकुमार यांनी एका मतदाराला मतदान केंद्रावरच कानाखाली मारली. विशेष म्हणजे मतदारानंही आमदाराच्या कानाखाली मारत त्याला जशास तसं उत्तर दिलं.

अन् आमदारानं मतदाराच्या कानाखाली लगावली...

गुंटूर येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिवकुमार आणि मतदार एकमेकांशी भिडल्याचं दिसत आहे. रांगेत उभ्या असलेल्या मतदारासोबत शिवकुमार यांचा काहीतरी वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्यानं त्यांनी थेट मतदाराच्या कानाखाली वाजवली.

मतदाराचं जशास तसं प्रत्युत्तर-

दरम्यान मतदारानंही शिवकुमार यांच्या कानाखाली मारत जशास तसं उत्तर दिलं. यानंतर या दोघांमध्येही हाणामारी झाली. दरम्यान शिवकुमार यांच्या समर्थकांनी मतदाराला मारहाण केली. भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) शेअर केला आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आमदाराचा अहंकार आणि गुंडागिरी असं त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in