आंध्र प्रदेशात अपघातानंतर बस पेटली; चालकासह तिघांचा होरपळून मृत्यू

काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारत आपले प्राण वाचवले.
आंध्र प्रदेशात अपघातानंतर बस पेटली; चालकासह तिघांचा होरपळून मृत्यू
(Photo-X)
Published on

नंद्याल : आंध्र प्रदेशातील नंद्याल जिल्ह्यात बस आणि कंटेनर लॉरी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना मंगळवारी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नेल्लोरहून हैदराबादकडे जाणाऱ्या खासगी बसचा अचानक टायर फुटला. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस आधी डिव्हायडरवर आदळली, त्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला जोरात धडकली.

धडकेनंतर आग

कंटेनर ट्रकमध्ये बाइकची वाहतूक केली जात होती. भीषण धडकेनंतर बस आणि ट्रक दोन्ही वाहनांना आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारत आपले प्राण वाचवले.

चालकासह ३ जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत बस आणि कंटेनर लॉरी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. या अपघातात बस चालक, ट्रक चालक आणि एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अनेकांची प्रकृती गंभीर

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. यापैकी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नंदयाल जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात टायर फुटल्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तीन महिन्यांत दुसरी घटना

विशेष म्हणजे, बसला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील कुरनूल येथेही बसला आग लागून २० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अवघ्या तीन महिन्यांत आग लागण्याची दुसरी घटना घडल्याने राज्यातील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in