

चिंतूर : आंध्र प्रदेशमधील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे चित्तूर जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मरेडुमिल्ली घाटातून जात असताना पहाटे दरीत कोसळली. बसमधून एकूण ३७ जण प्रवास करीत होते. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.
बस दरीत कोसळल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी मदतकार्य सुरू केले, त्याचबरोबर या अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांनी चिंतूर पोलीस, बचाव पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
बसचा भाग कापला
बचाव पथकाने बसचा काही भाग कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना घटनास्थळापासून १५ किलोमीटर दूर सीएचसी चिंतूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने सांगितले की, जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना भद्राचलम येथील रुग्णालयात हलविण्यात येईल.
चालकाचे नियंत्रण सुटले
या अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमधील प्रवासी हे भद्राचलम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले होते. तिथून ते अन्नवरमला जात होते. या समूहाने चित्तूरमधून बस भाड्याने घेतली होती. ही ३५ सीटर बस पूर्णपणे भरली होती. ही बस मरेडुमिल्ली घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली.