अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी हे निवडणुकीचा प्रचार करीत असताना त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आल्याने ते किरकोळ जखमी झाले. या प्रकारानंतर वायएसआर काँग्रेस पक्ष आणि तेलुगू देसम (टीडीपी) पक्षात रविवारी जोरदार शाब्दिक युद्ध पेटले.
विजयवाडा येथे शनिवारी प्रचार करताना अज्ञात इसमाने रेड्डी यांच्या दिशेने एक दगड जोरात भिरकावला. तो त्यांच्या डाव्या गालास लागल्याने रेड्डी यांना जखम झाली. हा मुख्यमंत्र्यांवरील पूर्वनियोजित हल्ला होता, असा आरोप पक्षाचे सरचिटणीस एस. रामकृष्ण रेड्डी यांनी केला. जगन मोहन रेड्डी यांना निवडणूक प्रचारात मिळत असलेला पाठिंबा पाहून टीडीपीला असुरक्षित वाटू लागल्याने हा हल्ला करण्यात आला, असे ते म्हणाले.
तेलुगू देसमचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच एका प्रचारसभेत जगन मोहन यांच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावले होते. जगन मोहन रेड्डी प्रचार करू शकले नाहीत तर त्याचा आपल्याला लाभ होईल, असे नायडू आणि त्यांच्या पक्षाला वाटते. त्यामुळे या हल्ल्यामागे नायडू आणि टीडीपीचा हात आहे असे आम्हाला वाटते, असे रामकृष्ण रेड्डी म्हणाले. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाने या हल्ल्याची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी केली.