आंध्रात उभे राहणार पहिले ‘एआय’ विद्यापीठ; राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला भूमिपूजन

जगात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग सुरू झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा बोलबाला सुरू आहे. आता ‘एआय’ची भविष्यातील गरज ओळखून शाळा व महाविद्यालयात त्याचे शिक्षण देणे गरजेचे बनणार आहे.
आंध्रात उभे राहणार पहिले ‘एआय’ विद्यापीठ; राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला भूमिपूजन
Published on

अमरावती : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग सुरू झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा बोलबाला सुरू आहे. आता ‘एआय’ची भविष्यातील गरज ओळखून शाळा व महाविद्यालयात त्याचे शिक्षण देणे गरजेचे बनणार आहे. ही गरज ओळखून आंध्र प्रदेश सरकारने देशातील पहिले एआय विद्यापीठ उभारण्याचे ठरवले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला ‘एआय’ विद्यापीठाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रुची, समज असलेल्यांनाच प्रवेश

आंध्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान सचिव भास्कर कटमनेनी यांच्या मते, हे विद्यापीठ आयआयटी आणि आयआयआयटी यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. येथे केवळ पदवी शिक्षण नसेल, तर इयत्ता आठवीपासूनच एआयमध्ये रुची आणि समज असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पीएचडीपर्यंतचे शिक्षण आणि शिष्यवृत्तीही दिली जाईल. २०२८ पर्यंत युनिव्हर्सिटी कार्यान्वित होईल आणि २०२९ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.येथे देशातील पहिले स्वदेशी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) विकसित केले जाईल, जे भारतीय भाषा, संस्कृती आणि सामाजिक गरजांनुसार असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून देश–विदेशातील सुमारे ५०० एआय स्टार्टअप्सना मदत केली जाईल. रतन टाटा इनोव्हेशन हबमार्फत विद्यार्थ्यांना थेट उद्योगाशी संबंधित प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि त्यासाठी नवीन एआय टूल्स याच ठिकाणी विकसित होतील.

मुलांना स्वतः उपाय शोधायला शिकवणार

कटमनेनी यांच्या मते, आयआयटी आणि आयआयआयटी जिथे तांत्रिक पदव्या आणि कोडिंगवर भर देतात, तिथे एआय युनिव्हर्सिटी बहुविषयक (मल्टीडिसिप्लिनरी) मॉडेलवर आधारित असेल. येथे शिक्षण पूर्णपणे प्रोजेक्ट-आधारित आणि प्रत्यक्ष उपयोगावर केंद्रित असेल; पदवीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाईल.यासाठी अभ्यासक्रम तीन टप्प्यांत राबवला जाईल. पहिला टप्पा शालेय स्तरावर असेल. यात एआयची मूलभूत माहिती, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांची ओळख करून दिली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात प्रॅक्टिकल्स जास्त

दुसरा टप्पा महाविद्यालयीन स्तराचा असेल. येथे पारंपरिक वर्ग कमी आणि प्रॅक्टिकल्स जास्त असतील. विविध विषयांचे विद्यार्थी—अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, शेती, सामाजिक शास्त्रे—आपापल्या क्षेत्राशी संबंधित एआय मॉडेल्स विकसित करतील. उदाहरणार्थ, शेतीतील पीक अंदाजासाठी किंवा कायदेशीर प्रकरणांचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर केला जाईल.तिसरा टप्पा पदव्युत्तर व पीएचडीचा असेल. येथे सखोल संशोधनावर भर दिला जाईल.भविष्यातील यंत्रणांची समज, नवीन अल्गोरिदम्स, मोठी भाषा मॉडेल्स आणि भारतीय गरजांनुसार स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित करणे, हाच या टप्प्याचा मुख्य उद्देश असेल.

म्हणूनच अमरावतीची निवड

अमरावती हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथे व्हीआयटी, एसआरएम, अमृता विद्यापीठ, एनआयडी, बीआयटीएस आणि लॉ युनिव्हर्सिटीसारख्या नामांकित संस्था आहेत. येथील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधन वातावरणाचा लाभ घेण्यासाठीच अमरावतीची एआय युनिव्हर्सिटीसाठी निवड करण्यात आली आहे.

सुविधा, प्राध्यापक आंध्र पुरवणार

विशेष बाब म्हणजे, जगातील आघाडीची संगणक चिप उत्पादक कंपनी एनवीडिया या प्रकल्पात आंध्र सरकारला मदत करत आहे. एनवीडिया केवळ तांत्रिक सहकार्यच करणार नाही, तर अभ्यासक्रमाची रचना, एआय कोर्स किट्सही विकसित करून देणार आहे. जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) आधारित संगणकीय संसाधनेही उपलब्ध करून दिली जातील. विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक हे आंध्र सरकारकडून दिले जाणार आहेत. सध्या ६५ एकर क्षेत्रावर काम सुरू झाले आहे. पुढील टप्प्यात या प्रकल्पाशी एनवीडियासारख्या इतर एआय कंपन्याही जोडल्या जातील आणि संशोधन प्रयोगशाळा (रिसर्च लॅब्स) विकसित केल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in