आंध्रात इंधन तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; हजारो वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी

आंध्र प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या भीतीपोटी सोमवारी हजारो वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली.
आंध्रात इंधन तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; हजारो वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी
आंध्रात इंधन तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; हजारो वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी(संग्रहित फोटो)
Published on

अमरावती : आंध्र प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या भीतीपोटी सोमवारी हजारो वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. राज्याच्या विविध भागांत इंधनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याची ग्वाही सरकारने दिली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत बहुतांश ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. नायडू यांनी राज्य सरकार आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्वतः या पुरवठ्यावर देखरेख ठेवावी, जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'रिअल टाइम गव्हर्नन्स सिस्टम'च्या (आरटीजीएस) माध्यमातून दर तीन तासांनी अपडेट्स देण्याचे आदेश त्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. इंधनाचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राजमहेंद्री, विजयवाडा आणि गुंटूरमधील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. साठवण्यासाठी प्लास्टिकचे डबे घेऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करताना दिसले.

गुंटूरमधील इंधन किरकोळ विक्रेते संघटनेचे सदस्य गोपाळ कृष्णा यांनी सांगितले की, ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असून डिझेलचा साठा संपत असल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात तेल कंपन्यांनी पुरवठा कमी करण्याचा विचार केला होता, जो नंतर थांबवण्यात आला, त्यामुळे हे संकट निर्माण झाले असावे असा दावा त्यांनी केला.

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काही पंपांवर इंधनाचे रेशनिंग केले जात असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे.. डिझेलच्या कमतरतेमुळे शेती आणि मत्स्यव्यवसायावर परिणाम होऊ लागला असून कापणीची यंत्रे उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in