
नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांची १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूकप्रकरणी मंगळवारी दिल्ली येथे ‘ईडी’ने चौकशी केली. अनिल अंबानी हे सकाळी ११ वाजता येथील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहचले. तेथे ‘ईडी’ने त्यांची दहा तास चौकशी केली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर पडले.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अनिल अंबानी यांचा ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत जबाब नोंदवण्यात आला असून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अंबानी यांनी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. माझ्या कंपन्यांनी नियामकांना आर्थिक स्थितीबाबत वेळोवेळी माहिती दिल्याचे ते म्हणाले. मात्र, ईडी ही अनिल अंबानी यांच्या उत्तरांशी सहमत नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते.