उद्योगपती अनिल अंबानी यांना ED चे समन्स; ५ ऑगस्टला चौकशी होणार

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

बँकांची कर्जे अनेक समूहातील कंपन्यांना आणि शेल (बोगस) कंपन्यांना वळवण्यात आल्याचा आरोप आहे. अंबानी यांच्याविरोधात ‘ईडी’ने लूकआऊट नोटीसही जारी केली आहे.

अनिल अंबानी यांची १७ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. या प्रकरणातील गुन्हा दिल्लीत दाखल झाला आहे. त्यामुळे अंबानी यांना ‘ईडी’ मुख्यालयात बोलावले आहे.

‘ईडी’ अंबानी यांचे निवेदन ‘पीएमएलए’अंतर्गत नोंदवून घेईल. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात ‘ईडी’ने ५० कंपन्यांच्या ३५ ठिकाणांवर व अनिल अंबानी यांच्या समूहातील अधिकाऱ्यांसहित २५ जणांच्या घरांवर छापेमारी केली होती. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसहित अनिल अंबानी समूहातील कंपन्यांमध्ये कथित आर्थिक अनियमितता आढळली.

logo
marathi.freepressjournal.in