...तर चिनी हल्ल्याचा वेग कमी झाला असता, CDS अनिल चौहान यांचे प्रतिपादन

१९६२ सालच्या भारत-चीनमध्ये युद्धाच्या वेळी हवाई दलाचा वापर केला असता, तर चिनी हल्ल्याचा वेग कमी झाला असता, असे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले.
...तर चिनी हल्ल्याचा वेग कमी झाला असता, CDS अनिल चौहान यांचे प्रतिपादन
Published on

पुणे : १९६२ सालच्या भारत-चीनमध्ये युद्धाच्या वेळी हवाई दलाचा वापर केला असता, तर चिनी हल्ल्याचा वेग कमी झाला असता, असे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले.

दिवंगत लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या सुधारित आत्मचरित्र ‘रिव्हेली टू रिट्रीट’च्या प्रकाशनावेळी जनरल चौहान यांचे विचार बुधवारी पुण्यात दाखविण्यात आलेल्या रेकॉर्डेड व्हिडीओ संदेशादरम्यान मांडले. थोरात हे भारत-चीन युद्धापूर्वी लष्कराच्या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

चौहान म्हणाले की, थोरात यांनी हवाई दलाचा विचार केला होता. पण त्या काळच्या सरकारने त्याला परवानगी दिली नाही. १९६२ च्या युद्धादरम्यान हवाई दलाचा वापर झाला असता तर भारताला मोठा फायदा झाला असता. कमी वेळेत हल्ले, भौगोलिक फायद्यांचा उपयोग आणि अधिक तीव्र हल्ले करता आले असते. त्यामुळे चीनच्या आक्रमणाचा वेग कमी झाला असता किंवा कदाचित पूर्ण थांबला असता. त्यामुळे सैन्याला तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असता, असे त्यांनी सांगितले. ‘फॉरवर्ड पॉलिसी’ लडाख आणि एनईएफए (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, सध्याचे अरुणाचल प्रदेश) या दोन्ही ठिकाणी सारखीच मोहीम राबवली जाऊ नये असे वाटत होते. कारण दोन्ही भागात वादाची पार्श्वभूमी वेगळी होती, भूभाग वेगळा होता आणि समान धोरण राबवणे चुकीचे ठरले. काळानुसार सुरक्षा परिस्थितीत बदल झाले आहेत आणि युद्धाचे स्वरूपच बदलले आहे, असे त्यांनी सांगितले.

सीडीएस चौहान म्हणाले की, थोरात यांचे आत्मचरित्र हे फक्त एका सैनिकाचे आत्मवृत्त नाही, तर त्यातून नेतृत्व, धोरण आणि भारताच्या लष्करी इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळते. त्या काळी ‘फॉरवर्ड पॉलिसी’ योग्य होती की नाही हे सांगणे कठीण आहे. कारण आता भौगोलिक आणि भू-राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पण माझ्या मते, लडाख आणि एनईएफएला सारखेच धोरण राबवणे चुकीचे आहे. लडाखमध्ये चीनने आधीच भारतीय भूभागावर कब्जा केला होता, तर एनईएफएमध्ये भारताचा दावा अधिक वैध होता, असे त्यांनी सांगितले.

त्या काळात हवाई दलाचा वापर ‘एस्केलेटरी’ समजला जात होता. पण आता तसे नाही आणि ऑपरेशन सिंदूर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे चौहान म्हणाले.

यंदा ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने हवाई दलाचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘रिव्हेली टू रिट्रीट’ हे फक्त आत्मचरित्र नाही. ते नेतृत्व, रणनीती आणि सेवेवर आधारित चिंतन आहे. ते सत्तेच्या निर्णयांवर प्रकाश टाकते, प्रामाणिकपणे समीक्षा करते आणि आजही लागू पडतील असे धडे देते, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in