अनमोल बिश्नोईला दिल्लीत अटक, अमेरिकेने हद्दपार केल्यानंतर NIA ची कारवाई

अनमोल बिश्नोई २०२२ पासून फरार होता. सध्या तुरुंगात असलेला त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई याच्या नेतृत्वाखालील टोळीत सहभागी असल्याबद्दल अटक झालेला तो १९ वा आरोपी आहे.
अनमोल बिश्नोई
अनमोल बिश्नोई
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली.

अनमोल बिश्नोई २०२२ पासून फरार होता. सध्या तुरुंगात असलेला त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई याच्या नेतृत्वाखालील टोळीत सहभागी असल्याबद्दल अटक झालेला तो १९ वा आरोपी आहे.

या प्रकरणात तपास केल्यानंतर ‘एनआयए’ने मार्च २०२३ मध्ये अनमोलवर आरोपपत्र दाखल केले होते. २०१० ते २०२३ या काळात देशात विविध गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी त्याने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना सक्रियपणे मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती ‘एनआयए’च्या प्रवक्त्यांनी दिली.

खंडणी वसुली

लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी अनमोल भारतातील त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया करीत होता. अनमोलने टोळीच्या शूटर्सना आणि गुंडांना आश्रय व आर्थिक मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. तो इतर गुंडांच्या मदतीने परदेशातून भारतात खंडणीही वसूल करीत होता.

पंजाबमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या इतर दोघांसह अनमोलला एका चार्टर्ड विमानाने अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले. अनमोलने आश्रयासाठी अर्ज केला होता, परंतु अमेरिकन न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आणि त्याला हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. अनमोलवर देशभरात अनेक खटले प्रलंबित आहेत. असे असले तरी ‘एनआयए’ अनमोलची मे २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या, बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारातील त्याच्या कथित भूमिकेची सर्वात आधी चौकशी करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in