अनुप बागची करणार HDFC बँकेचे नेतृत्व; स्पर्धक ICICI च्या अधिकाऱ्यावर रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब

एचडीएफसी बँकेचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक बनण्यासाठी खासगी बँकेची स्पर्धक आयसीआयसीआय समूहातील अनुप बागाची हे सज्ज झाले आहेत.
अनुप बागची करणार HDFC बँकेचे नेतृत्व; स्पर्धक ICICI च्या अधिकाऱ्यावर रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब
अनुप बागची करणार HDFC बँकेचे नेतृत्व; स्पर्धक ICICI च्या अधिकाऱ्यावर रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब
Published on: 

मुंबई : एचडीएफसी बँकेचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक बनण्यासाठी खासगी बँकेची स्पर्धक आयसीआयसीआय समूहातील अनुप बागाची हे सज्ज झाले आहेत. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या नावाला रिझर्व्ह बँकेने गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर शिक्कामोर्तब झाले.

अनुप बागाची हे १९९२ पासून प्रतिस्पर्धी आयसीआयसीआय बँक आणि तिच्या उपकंपन्यांशी संबंधित आहेत. ते शशिशधर जगदीशन यांची जागा घेतील. शशिशधर जगदीशन यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी अनैतिक आचरण आणि संशयास्पद कारभाराच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाले होते.

बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ते २७ ऑक्टोबरपासून एमडी आणि सीईओ पदाची धुरा सांभाळतील आणि त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल.कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार बागची यांच्या नियुक्तीला बँकेच्या भागधारकांची मंजुरी घ्यावी लागेल.

बागची यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर एचडीएफसी बँकेच्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

यंदा गैरव्यवहार आणि नैतिकतेच्या मुद्यांचा हवाला देत गैर-कार्यकारी अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वाचे प्रश्न चव्हाट्यावर आले होते.

यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक गोष्टी उघडकीस आल्या. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या दुबई शाखेने उत्पादनांची चुकीची विक्री केल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा प्रकार आणि ठेवी गोळा करण्याच्या प्रोत्साहनांचा समावेश होता, ज्यासाठी खुद्द जगदीशन यांना बँकेच्या संचालक मंडळाने दंड ठोठावला होता.

बागचींसमोर आव्हाने

५६ वर्षीय बागाची हे आयआयटी-कानपूर आणि आयआयएम-बंगळुरूचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०२३ पासून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी सहा वर्षे आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे. त्याआधी ते किरकोळ आणि घाऊक बँकिंग दोन्ही पाहत होते.

तज्ज्ञांच्या मते, निव्वळ व्याजाचे मार्जिन दबावाखाली असल्याने मुख्य उत्पन्न वाढवणे आणि उत्पादनांची चुकीची विक्री (मिस-सेलिंग) रोखणे ही बागाचींसमोर असणारी प्रमुख आव्हाने असतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in