मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का, 'या' मोठ्या नेत्याचाही पक्षाला रामराम

राहुल गांधींची यात्राही महाराष्ट्र आणि आसाममधून जाणार आहे. काँग्रेसला एका दिवसात दोन धक्के बसले आहेत.
मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का, 'या' मोठ्या नेत्याचाही पक्षाला रामराम

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होण्यापूर्वी या पक्षाला मोठा झटका मिळाला आहे. आधी दक्षिण मुंबईतील प्रभावी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता आसाममधील नेते अपूर्वा भट्टाचार्य यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला. हे दोन्ही राजीनामे पक्षासाठी मोठे नुकसान मानले जात आहे.

आसाममध्ये काँग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाम काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राजीनामा दिलेल्या दोन नेत्यांमध्ये नाजावचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बोरा आणि असाम प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पोरीटुष रॉय यांचा समावेश आहे. त्यानंतर रविवारी काँग्रेसचे सचिव अपूर्व भट्टाचार्य यांनीही राजीनामा दिला. विशेष म्हणजे, राहुल गांधींची यात्राही महाराष्ट्र आणि आसाममधून जाणार आहे. असे असताना काँग्रेसला रविवारी एकाच दिवसात दोन धक्के बसले.

पहिला धक्का मुंबईतून बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर लिहिले, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षात पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे." मिलिंद यांचे वडील मुरली देवरादेखील काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

logo
marathi.freepressjournal.in