अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरूप

उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि विशेष कमांडो पथके मंदिर परिसर आणि अन्यत्र तैनात केल्याने शहराला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरूप

अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि विशेष कमांडो पथके मंदिर परिसर आणि अन्यत्र तैनात केल्याने शहराला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरासाठी खास तिहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. मंदिराच्या अगदी जवळच्या वर्तुळात सीआरपीएफचे जवान तैनात असतील.

राममंदिर परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ १९९०च्या दशकापासून सांभाळत आले आहे. त्यांना या परिसराची खडान‌्खडा माहिती आहे.

मंदिराभोवतालच्या पहिल्या सुरक्षा कड्याभोवती रेड झोन नावाचे दुसरे कडे असेल. त्यात उत्तर प्रदेश सरकारच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्सचे (एसएसएफ) कमांडो तैनात करण्यात आले आहेत. या दलाच्या ४०० कमांडोंना नॅशनल सिक्युरिटी गार्ड‌्सच्या (एनएसजी किंवा ब्लॅक कॅट कमांडो) कमांडोंनी गेले दोन ते तीन महिने खास प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. त्यापैकी १०० निवडक कमांडो, उत्तर प्रदेशच्या प्रोव्हिन्शियल आर्म्ड कॉन्स्टिब्युलरीचे(पीएसी) जवान असा १४०० सुरक्षारक्षकांचा गराडा मुख्य सुरक्षा कड्याभोवती असेल.

त्याबाहेर सुरक्षेचे तिसरे कडे कार्यरत असेल. त्याला यलो झोन म्हणून संबोधण्यात आले आहे. त्यात उत्तर प्रदेश पोलीस, पीएसी आणि एसएसएफचे कमांडो यांच्या संमिश्र पथकांचा समावेश असेल. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) खास कमांडोही सुरक्षा व्यवस्थेत सामील असणार आहेत. याशिवाय शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन्स, मेटल डिटेक्टर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in