नवी दिल्ली : तुष्टीकरण, भ्रष्टाचार, घराणेशाही या लोकशाहीला लागलेल्या तीन विकृती आहेत, ज्यामुळे आपल्या देशाचे आणि समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मार्गात या विकृतींचा मोठा अडथळा असणार आहे. त्यामुळे विरोधात आपला लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केला. ध्वजारोहणानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, निमंत्रित उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा सलग १० व्या वर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांत सरकारने राबवलेल्या विकास योजनांमुळे देशात झालेल्या प्रगतीचा आलेख सांगितला, त्याचवेळी त्यांनी लोकशाहीसाठी बाधक असलेल्या अपप्रवृत्तीवरही प्रहार केला. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा प्रामाणिकपणे सुरू आहे. त्यामुळेच आज भ्रष्ट लोकांना जामीन देखील मिळत नाहीत, तशी पक्की व्यवस्था आम्ही केली आहे. घराणेशाही आणि तुष्टीकरणाने देशाचे खूप मोठे नुकसान केले आहे. लोकशाहीमध्ये हे कसे काय होऊ शकते, असा सवाल मोदी यांनी यावेळी केला. घराणेशाही आज माझ्या देशाच्या लोकशाहीत एक विकृती बनली आहे, ज्यामुळे लोकशाही कधीच बळकट होऊ शकत नाही. ‘पार्टी ऑफ द फॅमिली, 'बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली' असा काहींच्या जीवनाचा मंत्र बनला आहे. अशा लोकांचे राजकीय पक्ष फक्त कुटुंबासाठी आहेत. घराणेशाही आणि आप्तस्वकियांचं हित जोपासण्याची वृत्ती गुणवत्तेचे शत्रू असतात. योग्यतेला नाकारतात. सामर्थ्याचा स्वीकार करत नाहीत. म्हणूनच या देशाच्या मजबुतीसाठी घराणेशाहीचे उच्चाटन आवश्यक आहे. 'सर्वजनहिताय सर्वजनसुखाय' प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळावा, यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी देखील हे अतिशय गरजचे आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 'त्याचप्रकारे तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. सामाजिक न्यायाला जर कोणी उद्ध्वस्त केले असेल तर ती आहे तुष्टीकरणाची विचारसरणी! तुष्टीकरणाचे राजकारण, तुष्टीकरणाचा सरकारी योजनांचा प्रकार याने सामाजिक न्यायाचा बळी दिला आहे. म्हणूनच आपल्याला तुष्टीकरणापासून दूर राहिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
आज आपण निर्णायक वळणावर उभे आहोत. असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जशी जागतिक व्यवस्था पूर्णपणे बदलली, तशीच ती कोविडपश्चात काळात पुन्हा एकदा बदलत आहे. या नवीन व्यवस्थेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. १४० कोटी भारतीयांची शक्ती नव्या जगाला आकार देताना मी पाहत आहे. असे सांगत पंतप्रधानांनी समस्त भारतीयांच्या आशा-आकांक्षा प्रकट केल्या. जागेपणी आणि स्वप्नातदेखील मी सतत देशवासीयांच्या हिताचाच विचार करतो. तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात. मी २०१४ साली देशात बदलाचे वचन घेऊन तुमच्यासमोर आलो. माझे हे वचन पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. माझ्या या कामाची दखल घेऊन तुम्ही २०१९ साली पुन्हा माझ्यावर विश्वास टाकलात. पुढील पाच वर्षे अभूतपूर्व प्रगतीची असणार आहेत. आगामी पाच वर्षांचा काळ देशाचे २०४७ सालाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा सर्वोत्तम काळ आहे. २०४७ साली देश जेव्हा शंभरावा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, तेव्हाचा तिरंगा विकसित भारताचा तिरंगा असेल. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्याला देशाचे पुढील हजार वर्षांचे भवितव्य लिहिण्याची संधी आहे, असा आशावाद मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्याला २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करण्याला आपण नकार देणे आवश्यक आहे. देशाच्या लोकशाहीला घराणेशाहीचा रोग लागला आहे. आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी भ्रष्टाचार, नाकर्तेपणा आणि तुष्टीकरण या तीन दुर्गुणांचा त्याग करण्याची गरज आहे. आज आपल्याकडे तरुण लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे. या त्रिवेणी संगमात आपल्या स्वप्नपूर्तीची ताकद आहे. बदलत्या जगात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे, असेही मोदी म्हणाले.
मी पुन्हा येईन -मोदी
मंगळवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या शानदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तेव्हा त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. पंतप्रधान या नात्याने मोदी यांचे हे लाल किल्ल्यावरून केले जाणारे शेवटचे भाषण असेल, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्याला उत्तर देताना मोदी यांनी श्रोत्यांना ग्वाही दिली की, पुढील वर्षीही याच लाल किल्ल्यावरून देशाच्या प्रगतीची गाथा सांगण्यासाठी मी पुन्हा येईन.
रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म
मी जेव्हा २०१४ मध्ये तुमच्याकडे परिवर्तनाचे आश्वासन घेऊन आलो होतो, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला. मी तो विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म’द्वारे परिवर्तनाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला मी पहिल्या पाच वर्षांत विश्वासात रूपांतरित केले आहे. कठोर परिश्रम केले आहेत. फक्त आणि फक्त ‘नेशन फस्ट’… सर्वात आधी देश या भावनेने केले आहेत. २०१९ मध्ये कामगिरीच्या आधारावर तुम्हा सर्वांनी पुन्हा एकदा आशीर्वाद दिला. परिवर्तनाचे आश्वासन मला इथे घेऊन आले आहे. आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. २०४७ चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आगामी पाच वर्षे आहेत. देशाने साध्य केलेली कामगिरी, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प, त्यावर झालेली प्रगती, त्याचे जे यश आहे त्याचे गौरवगान पुढच्या वेळी १५ ऑगस्टला याच लाल किल्ल्यावरून मी त्याहीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करेन, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पगडीची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी लाल किल्ल्यावरून भाषण करताना वेगवेगळा पेहराव करतात आणि त्याची रसभरीत चर्चाही रंगते. यंदा मोदी यांनी डोक्यावर राजस्थानी बांधणी प्रकारची पगडी धारण केली होती. लाल आणि पिवळ्या रंगातील ही पगडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या वर्षअखेरपर्यंत राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मोदींनी स्वातंत्र्यदिनी राजस्थानी पगडीला पसंती दिली असावी, अशी चर्चा रंगली होती.