
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी एकूण ३५ न्यायाधीशांची नेमणूक आणि बदल्या जाहीर केल्या. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने न्यायाधीश पदावर नेमणुकीसाठी आणखी २० नव्या नावांची शिफारस केली होती. त्यात १३ वकील आणि ७ न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश पदावर नेमणूक केली जाऊ शकते, अशी शिफारस कॉलेजिअमने केली आहे.
अभय मंत्री, शाम छगनलाल चंडोक, आणि नीरज प्रदीप धोटे यांची मुंबर्इ उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाचे न्या. अरुण मोंगा आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुन्नुरी लक्ष्मण यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमची मंगळवारी बैठक झाली. तेव्हा कॉलेजिअमने ५ न्यायिक अधिकारी व ४ वकील यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश पदी नियुक्ती केली.
तसेच पंजाब हरयाणा उच्च न्यायालयातील ५ न्यायाधीश आणि दोन वकील यांची उत्तराखंड आणि गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती केली. तसेच दोन न्यायिक अधिकाऱ्यांची पाटणा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती केली. बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांमध्ये मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. त्यांची मणिपूर अथवा मद्रास उच्च न्यायालयात नेमणूक करण्याची विनंती कॉलेजिअमने फेटाळली आहे.