चंद्रावरील ‘शिवशक्ति’ पॉईंटच्या नामकरणाला मान्यता; आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेचा निर्णय

पंतप्रधान मोदी यांनी ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-३’ उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ति’ पॉईंट असे नामकरण केले. आता या नावाला आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाने १९ मार्च रोजी मान्यता दिली आहे.
चंद्रावरील ‘शिवशक्ति’ पॉईंटच्या नामकरणाला मान्यता; आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : भारताने गेल्यावर्षी २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-३’ उतरवून जगात इतिहास घडवला. हा पराक्रम करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिण भागात गेलेला नव्हता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-३’ उतरले, त्या जागेला ‘शिवशक्ति’ पॉईंट असे नामकरण केले. आता या नावाला आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाने १९ मार्च रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे अधिकृतरित्या ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-३’ उतरले तो भाग आता ‘शिवशक्ति’ पॉईंट नावाने अधिकृतरित्या ओळखला जाणार आहे.

ग्रहांच्या नावांच्या गॅझेटियरनुसार, ग्रहांच्या नामकरणासाठी आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या कार्यकारी समितीने ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या पॉईंटला ‘शिवशक्ति’ हे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. काही खास जागांचे नामकरण करण्याबरोबरच ग्रहांच्या खास जागांची विशेष नावाने ओळख पटवण्यासाठी त्याचे नामकरण केले जाते. त्यामुळे भविष्यात त्या जागेची ओळख पटकन मिळू शकते. तसेच लोक त्याची चर्चा करू शकतील.

पंतप्रधान मोदींनी केले होते नामकरण

२३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर लँडिंग केल्यानंतर बेंगळुरूत पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रो सेंटरमध्ये या नावाची घोषणा केली होती. तेव्हा मोदी म्हणाले होते की, चांद्रयान-३ लँडिंग झालेल्या नावाचे नामकरण ‘शिवशक्ति’ असेल तर २०१९ मध्ये ‘चांद्रयान-२’ कोसळून ज्या जागेवर उतरले, त्या जागेला ‘तिरंगा’ असे नाव दिले आहे. त्याचबरोबर २३ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा करण्याचे त्यांनी जाहीर केले होते.

logo
marathi.freepressjournal.in