नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ४०० हॉवित्झर तोफा खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. यासाठी सुमारे ६५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या तोफा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच डीआरडीओने पूर्णत: स्वदेशात तयार केल्या आहेत.
एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकार लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहे, ज्यामध्ये हॉवित्झर तोफा खरेदी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ही तोफ जुन्या तोफांपेक्षा खूपच हलकी आहे.
हॉवित्झरना अॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम म्हणजे थोडक्यात एटीएजीएस देखील म्हणतात. नावाप्रमाणे ही एक टोड तोफ आहे, म्हणजे ट्रकने खेचलेली तोफ. मात्र, हे शेल डागल्यानंतर ते बोफोर्सप्रमाणे स्वतःहून काही अंतरावर जाऊ शकते. या तोफेची कॅलिबर १५५ मिमी आहे. म्हणजेच या आधुनिक तोफातून १५५ मिमी शेल डागता येतील. एटीएजीएस ला हॉवित्झर देखील म्हणतात. हॉवित्झर म्हणजे लहान तोफा. किंबहुना दुसऱ्या महायुद्धात आणि त्यापुढील काळात युद्धात खूप मोठ्या आणि जड तोफांचा वापर करण्यात आला. त्यांना लांब अंतरावर नेण्यात आणि उंचावर तैनात करण्यात अनेक अडचणी आल्या. अशा स्थितीत हलक्या आणि छोट्या तोफा बनवल्या गेल्या, ज्यांना हॉवित्झर असे म्हणतात. ही तोफ डीआरडीओच्या पुणेस्थित लॅब एआरडीई, भारत फोर्ज लिमिटेड, महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टीम, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने विकसित केली आहे. त्याचे विकासकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि पहिली यशस्वी चाचणी १४ जुलै २०१६ रोजी घेण्यात आली. या तोफेचा वापर आणि वैशिष्ट्ये बोफोर्स तोफेशी मिळतीजुळती आहेत, म्हणून या तोफेला मूळ बोफोर्स असेही म्हणतात.
हॉवित्झरची वैशिष्ट्ये
० शेलची रेंज बोफोर्सपेक्षाही अधिक (४८ किलोमीटर)
० १५५ एमएम श्रेणीतील सर्वाधिक गोळे डागण्याची क्षमता
० -३० ते ७५ अंश सेल्सिअस तापमानात गोळे डागण्याची क्षमता
० मिनिटाला ५ गोळे डागण्याची क्षमता
० ऑटोमॅटिक रायफलसारखी सेल्फ लोडिंग सिस्टिम
० रात्री तोफांना लक्ष्य करण्यासाठी थर्मल साइट सिस्टीम
० वायरलेस कम्युनिकेशन सिस्टिम