
एअर इंडियाच्या सुमारे ४५०० कर्मचाऱ्यांनी कंपनीने देऊ केलेली व्हीआरएस अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अंतर्गत सूत्रांकडून समोर येत आहे.
टाटा समूहाने, एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये नवीन नियुक्त करण्यासाठी आपल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना एक आकर्षक व्हीआरएस योजना ऑफर केली होती.
एअर इंडियाच्या एक्झिक्युटिव्हच्या मते, एअरलाइन सध्या खर्चात कपात करणे, उत्पादकता सुधारणे तसेच परंपरागत प्रणालींचे पुनरुज्जीवन करणे आणि डिजिटल संस्कृती स्वीकारणे यासारख्या सुधारणांवर काम करत आहे. टाटा समूहाने जेव्हा एअर इंडियाचे अधिग्रहण केले तेव्हा एअर इंडियामध्ये सुमारे १३ हजार कर्मचारी होते. त्यापैकी ८ हजार कायमस्वरूपी होते आणि बाकीचे कंत्राटी तत्त्वावर होते.
एअर इंडियाच्या सूत्रानुसार, कंपनीमध्ये मोठ्या बदलाची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीशी संबंधित अधिकारी सांगतात की आम्ही काही अत्याधुनिक विमाने खरेदी करणार आहोत. यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या उच्च प्रतिभेची गरज आहे, जी नवीन इंजिन आणि मशीन ऑपरेट करू शकतात.
कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही फ्लीट अपग्रेडेशन, अधिकाधिक गंतव्यस्थानांवर विमानसेवा चालवणे आणि विमानात, जमिनीवर लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यावर काम करत आहोत.
जून महिन्यात एअर इंडियाने कायम कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस घेण्यासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा ५५ वर्षांवरून ४० वर्षे केली होती. यासोबतच कंपनीच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, कंपनीचे जे कर्मचारी १ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत व्हीआरएससाठी अर्ज करतील, त्यांनाही एक्स-ग्रेशिया रक्कम दिली जाईल. येत्या दोन वर्षांत एअर इंडियाचे सुमारे ४००० कर्मचारीही निवृत्त होणार आहेत.