अभिनेत्री झरीन खानविरोधात अटक वॉरंट; फसवणुकीच्या तक्रारीवरून कोलकाता न्यायालयाचा आदेश

नरकेलडांगा पोलिसांनी सियालदाह न्यायालयात आरोपपत्र सादर केले
अभिनेत्री झरीन खानविरोधात अटक वॉरंट; फसवणुकीच्या तक्रारीवरून कोलकाता न्यायालयाचा आदेश

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानविरोधात फसवणुकीच्या तक्रारीवरून कोलकाताच्या सियालदाह न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. कोलकाता येथील एका इव्हेंट कंपनीने झरीन खानविरोधात तक्रार दाखल केली होती. झरीन खानने जामीनासाठी कोणताही अर्ज केला नाही किंवा ती कोर्टासमोर हजर न राहिल्याने अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.

२०१८ मध्ये कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील काली मातेच्या ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल झरीन खान आणि तिच्या मॅनेजरविरोधात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मॅनेजरने कोर्टासमोर हजर राहत जामीन मिळवला होता. मात्र, झरीन खान कोर्टासमोर हजर राहिली नाही किंवा जामीनासाठी अर्जही केला नाही. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदाह न्यायालयात आरोपपत्र सादर केले.

अटक वॉरंटबाबत झरीन खान म्हणाली की, “याप्रकरणी मला काहीही माहिती नाही. या प्रकरणाने मला धक्का बसला असून माझ्या वकिलांसोबत चर्चा करून मी पुढे काय करायचे, हे ठरवणार आहे.” झरीन खानने २०१० मध्ये सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. २०२१मध्ये तिचा ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झरीनने ‘हाऊसफुल्ल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अक्सर २’ आणि ‘१९२१’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in