'त्या' विमानाचे मायदेशी आगमन लांबले; गुंतागुंत वाढली : ५० भारतीयांचा फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज, तर ५५ प्रवाशांचा परतण्यास नकार

विमानातील ५० प्रवाशांनी फ्रान्सकडे राजकीय आश्रय मागितला आहे. तर अन्य ५५ प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिला आहे.
'त्या' विमानाचे मायदेशी आगमन लांबले; गुंतागुंत वाढली : ५० भारतीयांचा फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज, तर ५५ प्रवाशांचा परतण्यास नकार
PM

नवी दिल्ली : मानवी तस्करीच्या संशयाखाली फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेल्या भारतीय प्रवाशांना मायदेशी परत घेऊन येणाऱ्या विमानाचे आगमन लांबणीवर पडले आहे. पूर्वनियोजनानुसार सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत हे विमान मुंबईत येणे अपेक्षित होते. मात्र, विमानातील ३०३ प्रवाशांपैकी ५० प्रवाशांनी फ्रान्समध्ये राजकीय आश्रय मिळण्याचा अर्ज केल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

रुमानियाच्या लिजिंड एअरलाइन्सचे एअरबस ए-३४० प्रकारचे विमान गेल्या आठवड्यात ३०३ प्रवाशांना घेऊन संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दुबईहून मध्य अमेरिकेतील निकाराग्वा या देशात निघाले होते. वाटेत गुरुवारी हे विमान फ्रान्समधील पॅरिसपासून १५० किमी अंतरावरील वॅट्री नावाच्या विमानतळावर उतरले. तेथे फ्रान्सच्या पोलिसांना या विमानातील प्रवाशांबद्दल संशय आला. या प्रवाशांत बहुसंख्य भारतीय आहेत आणि त्यातही हिंदी आणि तमिळ भाषिकांचा जास्त भरणा आहे. हे प्रवासी निगाराग्वातून पुढे अवैधपणे अमेरिकेत किंवा कॅनडात घुसण्याचा प्रयत्न करणार असल्याची शंका फ्रान्सच्या पोलिसांना आली. त्यामुळे त्यांना तीन दिवस फ्रान्समध्ये थांबवण्यात आले आणि स्थानिक पोलीस आणि न्यायालयाकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

फ्रान्सचे पोलीस संशयितांना एका वेळी जास्तीत जास्त चार दिवस विमानतळावर थांबवू शकतात. त्यापढे त्यांना आणखी चार दिवस थांबवण्यासाठी स्थानिक न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. अशा प्रकारचे मुदतवाढ देऊन संशयितांना फ्रान्समध्ये जास्तीत जास्त २६ दिवस थांबवता येते. पण फ्रान्सच्या न्यायालयाने तीन दिवस प्रवाशांची कसून चौकशी करून त्यांना पुढील प्रवासाची परवानगी दिली. त्यानुसार हे विमान भारतीय प्रवाशांना घेऊन सोमवारी फ्रान्समधून निघणार होते आणि दुपारी अडीच वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार होते.

मात्र, विमानातील साधारण ५० भारतीय प्रवाशांनी पुढील प्रवास करणे किंवा भारतात परत येण्याला नकार देऊन फ्रान्समध्येच आश्रय मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या ५० प्रवाशांना फ्रान्समध्ये राजकीय आश्रय देण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी त्यांची पुन्हा चौकशी करून स्थानिक प्रशासनाकडून मुलाखती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विमानाचे भारतात परतणे लांबणीवर पडले आहे.

 भारतीय दूतावासाकडून मदत

फ्रान्समध्ये थांबवलेल्या सर्व प्रवाशांना तेथील भारतीय दूतावासाकडून मदत दिली जात आहे. विमानतळावर त्यांच्या त्यात्पुरत्या निवासाची, अंघोळीची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या प्रवाशांना प्रशासकीय बाबतीत मदतीसाठी दूतावासाकडून सुविधा (कॉन्सूलर अॅक्सेस) दिली जात आहे. तसेच या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चाही सुरू आहे.  

५५ भारतीयांचा परतण्यास नकार

विमानातील ५० प्रवाशांनी फ्रान्सकडे राजकीय आश्रय मागितला आहे. तर अन्य ५५ प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिला आहे. त्यांनी पूर्वनियोजनानुसार निकाराग्वातच जाण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. दरम्यान, फ्रान्सच्या न्यायालयाने विमानातील दोन भारतीयांना मुक्त करण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांची फ्रान्समध्येच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे भारतीयांनी अमेरिकेच्या सीमावर्ती देशांत प्रवेश करून, तेथून मेक्सिकोमार्गे अमेरिकेत घुसण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in