केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचे उपोषण

सुशील गुप्ता यांच्यासह हरयाणा आपचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुराग धांडा आणि अनेक कार्यकर्ते पवित्र ब्रह्म सरोवर येथे उपोषण करण्यासाठी जमले होते. यावेळी गुप्ता यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आणि ते हुकूमशाही वृत्ती दाखवत असल्याचा आरोप केला.
केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचे उपोषण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने (आप) देशव्यापी सामूहिक उपोषणाची हाक दिली होती. त्यानुसार रविवारी आप नेते व कार्यकर्त्यांनी देशभर एक दिवसाचे उपोषण करून निषेध व्यक्त केला.

हरयाणात आपचे प्रमुख सुशील गुप्ता यांच्यासह राज्य शाखेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रविवारी कुरूक्षेत्र येथे एक दिवसाचे उपोषण केले. तर नवी दिल्लीत जंतरमंतर येथे आपचे नेते संजय सिंग, अतिशी सिंग यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही सामूहिक उपवास कार्यक्रमात सहभाग घेतला. पंजाबमध्येही आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे उपवास करून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला.

सुशील गुप्ता यांच्यासह हरयाणा आपचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुराग धांडा आणि अनेक कार्यकर्ते पवित्र ब्रह्म सरोवर येथे उपोषण करण्यासाठी जमले होते. यावेळी गुप्ता यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आणि ते हुकूमशाही वृत्ती दाखवत असल्याचा आरोप केला.

भाजप लोकशाहीची हत्या करत आहे. प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. केजरीवाल किंवा आप कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षाने अवलंबलेल्या रणनीतीची भीती वाटत नाही. सध्या निवडणुकीदरम्यान दोन मुख्यमंत्र्यांना (केजरीवाल आणि झारखंडचे हेमंत सोरेन) अटक केल्याने भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी गुप्ता म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in