नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तत्काळ दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. केजरीवाल यांच्या जामिनावर २६ जूनला सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांना जामीन देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या आदेशाविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्या. मनोज मिश्रा व एस.वी.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने सांगितले की, हायकोर्टाला आपला आदेश देऊ देत. आम्ही आमचे आदेश २६ जूनला देऊ.
सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्यावतीने विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी बाजू मांडली. कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामीन अर्जावरील स्थगिती उठवावी, असे सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.
त्यावेळी ‘ईडी’च्यावतीने एएसजी एस.वी. राजू यांनी केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने अभिषेक सिंघवी यांना सांगितले की, हायकोर्टाच्या स्थगिती आदेशाच्याविरोधात केजरीवाल यांच्या याचिकेवर कोणताही आदेश आम्ही दिल्यास आम्ही पूर्वग्रहदूषितपणे वागत असल्याचे दिसेल.