नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाला मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पीईटी-सीटी स्कॅनसह अनेक वैद्यकीय चाचण्या करावयाच्या असल्याने जामिनाला आणखी सात दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
मद्य धोरण घोटाळा मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी त्यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि २ जून रोजी त्यांना शरण येण्याचे आदेश दिले होते.
केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली असून जामिनाला सात दिवस मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. आपले सात किलो वजन कमी झाले असून केटोन पातळी खूप वाढली असून हे गंभीर विकाराचे सूचक आहे, असे केजरीवाल यांनी याचिकेत म्हटले आहे. पीईटी-सीटी स्कॅनसह अन्य वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे असल्याने जामिनाला मुदतवाढ आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.