केजरीवालांचे राजीनामास्त्र! दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय २-३ दिवसांत

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केल्यानंतर आता केजरीवाल यांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आहे.
संग्राहित छायचित्र
संग्राहित छायचित्र
Published on

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केल्यानंतर आता केजरीवाल यांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आहे. भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता जनतेच्या कोर्टात माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल. निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. असे सांगत केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, “मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी आणि मनीष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील.”

“आता दोन दिवसांत आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये माझ्याऐवजी आम आदमी पक्षामधील दुसऱ्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात येईल. आता दिल्लीच्या जनतेचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. आता थेट दिल्लीच्या नागरिकांनी मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनीष सिसोदिया आम्ही जबाबदारी स्वीकारणार आहोत. जनतेला मी प्रामाणिक वाटत असेल तरच जनतेने निवडून द्यावे आणि जर मी प्रामाणिक नसेन तर जनतेने निवडून देऊ नये, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले आहे. “मी देशातील सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना हात जोडून आवाहन करतो की, जर पंतप्रधानांनी तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकले, तर कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नका. आपल्यासाठी पद नाही, देशाचे संविधान आणि लोकशाही आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या बहुमताने जिंकलेले सरकार केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी बरखास्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांचा हा नवा फॉर्म्युलाही आम आदमी पक्षाने फोल ठरवला आहे,” असेही केजरीवाल म्हणाले.

“दिल्लीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. मात्र महाराष्ट्रासोबत या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी जबाबदारी घेणार नाही. निवडणुकांपर्यंत आम आदमी पक्षाचा दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल,” असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

“मी तुरुंगात असताना, नायब राज्यपालांना पत्र लिहून माझ्या जागी आतिशी यांना ध्वज फडकावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर, परत पत्र लिहिले तर तुम्हाला कुटुंबाला भेटू देणार नाही, अशी धमकी मला देण्यात आली. आम आदमी पक्षाचे खच्चीकरण करणे हाच मला तुरुंगात पाठवण्यामागचा उद्देश होता. पण तुरुंगातील दिवसांनी मी आणखी मजबूत झालो. मी तुरुंगातून राजीनामा दिला नाही, कारण मला देशातील लोकशाही अधिक मजबूत व्हावी, असे वाटत होते. तुरुंगातूनही सरकार चालवता येते, हे मी दाखवून दिले,” असेही ते म्हणाले.

जनतेच्या निर्णयानंतरच पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसेन, भाजपपुढे झुकणार नाही!

जनतेच्या आशीर्वादाने भाजपच्या सर्व कटकारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आपल्याकडे आहे. आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, थांबणार नाही आणि विकलोही जाणार नाही. आज आम्ही दिल्लीसाठी खूप काही करू शकतो, कारण आम्ही प्रामाणिक आहोत. आज ते आपल्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते प्रामाणिक नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर प्रहार केला.

अग्निपरीक्षा द्यायला तयार

मी सत्तेचा खेळ खेळायला आलो नाही, देशासाठी काहीतरी करायला आलो आहे. प्रभू राम जेव्हा १४ वर्षांनी वनवासातून परतले, तेव्हा सीतामातेला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले होते. आज मी तुरुंगातून आलो आहे आणि अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत, मी काम करू शकणार नाही, असे काही लोक सांगत आहेत. गेल्या १० वर्षांत विरोधकांनी ‘आप’वर अटी लादण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

तुरुंगात असतानाच राजीनामा का दिला नाही? - भाजप

केजरीवाल यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची गरज का? केजरीवाल यांनी तुरुंगात असताना राजीनामा का दिला नाही. केजरीवाल यांना बाहेर आल्यानंतर काहीतरी सेटल करायचे होते का, म्हणून ते कारागृहातून राजीनामा देण्यास तयार नव्हते? आम आदमी पक्षात फूट पडली आहे. हे हाताळण्यासाठीच केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे, असा आरोप भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजीनामा देऊन केजरीवाल यांनी एकप्रकारे आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिली आहे, असा दावाही भाजपने केला.

हे तर केवळ नाटक - काँग्रेस

केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, “हे तर केवळ एक नाटक आहे. केजरीवाल यांनी फार पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वोच्च न्यायालयानेच केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात परत येऊ नये किंवा कोणत्याही अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नये, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय त्यांना गुन्हेगारासारखे वागवत आहे. या परिस्थितीत नैतिकतेचा आणि केजरीवाल यांचा काहीही संबंध नाही.”

‘उशिरा सुचलेले शहाणपण’

केजरीवाल यांचे राजीनामा देण्याबाबतचे भाष्य म्हणजे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. आपण केजरीवाल यांना सुरुवातीपासून समाजसेवा करा, खूप पुढे जाल, असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता त्यांना याची जाणीव झाली आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in