केजरीवाल यांचे तिहार कारागृहात आत्मसमर्पण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत १ जून रोजी संपल्यानंतर ते रविवारी तिहार कारागृहात परतले.
केजरीवाल यांचे तिहार कारागृहात आत्मसमर्पण
X | AAP

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत १ जून रोजी संपल्यानंतर ते रविवारी तिहार कारागृहात परतले.

केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर रविवारी केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तिहार कारागृहात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजरीवाल यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि आपचे नेते आणि कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात संबोधित केले.

भ्रष्टाचारामध्ये गुंतलो असल्यामुळे नव्हे तर हुकूमशाहीविरोधात आवाज उठविल्यामुळे आपण कारागृहात परतत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला २१ दिवसांचा दिलासा दिला होता. हे २१ दिवस अविस्मरणीय होते. आपण एक मिनिटही वाया जाऊ दिला नाही. देशाला वाचविण्यासाठी प्रचार केला. ‘आप’ महत्त्वाचा नाही तर देश सर्वप्रथम आहे, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल तिहार कारागृहाजवळ येण्यापूर्वी त्या परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी केजरीवाल यांच्यासमवेत त्यांची पत्नी सुनीता, आपचे नेते भारद्वाज, गेहलोत, संजय सिंह, मंत्री अतिशी आदी नेते हजर होते.

मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खोटे - केजरीवाल

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तो सपशेल खोटा आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. मोदी ४ जून रोजी सरकार स्थापन करणार नाहीत, तुम्हाला नैराश्येत ढकलण्यासाठीचे हे मनाचे खेळ आहेत, असेही केजरीवाल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in