

नवी दिल्ली : बॉलीवडू अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित "बॅड्स ऑफ बॉलिवूड" या वेब सीरिजमुळे आपली प्रतिमा मलिन झाली असल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची याचिका फेटाळून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना गुरुवारी चांगलाच दणका दिला.
वानखेडेंचा आरोप काय?
समीर वानखेडेंनी आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिजमध्ये आपली प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप केला होता. या सीरिजमधील काही दृश्यांमधून आपला अप्रत्यक्षपणे अपमान करण्यात आल्याचे नमूद करून वानखेडेंनी दिल्ली उच्च न्यायालयात शाहरुख खान, गौरी खान, नेटफ्लिक्स इंडिया आणि रेड चिलीजविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
समीर वानखेडेंनी या खटल्यात २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तसेच सीरिजमधून ड्रग्स केसशी संबंधित कंटेंट तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. या रकमेचा वापर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा दावा त्यांनी केला होता.
वानखेडेंनी सीरिजमधील एका दृश्यावर विशेष आक्षेप घेतला होता. या दृश्यात एक नार्कोटिक्स अधिकारी नशा करत असलेल्या डीजेजवळ जातो, नंतर तो एका तरुणाकडे इशारा करत म्हणतो की, “तो स्टार किड नाही” आणि मस्ती करत असलेल्या त्या स्टार किडला ताब्यात घेतो. या दृश्यातून आपल्याला लक्ष्य केले असून, आपली बदनामी करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला होता.
ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडेंनी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. मात्र नंतर आर्यन खान यांना या प्रकरणात ड्रग्सच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले. याच घटनेशी मिळतीजुळती कथा सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याने आपण बदनाम झाल्याचा दावा करत वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती.