
हैदराबाद : एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक असल्याचे त्या देशाने आतापर्यंतच्या सर्व घटनांतून सिद्ध केले. पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे. भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावे लागेल की गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा ओवैसी यांनी शनिवारी एका मुलाखतीदरम्यान दिला.
मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि अलीकडे पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि आयसिस भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवणे हे याचे पहिले उदाहरण होते. तेव्हापासून ते हेच करत आहेत आणि भविष्यातही तेच करत राहतील, असे ताशेरे ओवैसींनी पाकिस्तानवर ओढले.
शिष्टमंडळातील समावेशाबाबत काय म्हणाले?
केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात असदुद्दीन ओवैसी यांना एका शिष्टमंडळाचा सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट असणार आहे. याबाबत ओवैसी म्हणाले, हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे. मी ही जबाबदारी गांभीर्याने घेईन. निघण्यापूर्वी एक सविस्तर बैठक घेतली जाईल. मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन. तसेच पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे हे योग्य नाही. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे. हे जगाला सांगणे देखील महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
सोफिया देशाची कन्या
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, कर्नल सोफिया ही देशाची कन्या आहे आणि ती आपल्या सशस्त्र दलांचा एक भाग आहे. मंत्र्यांचे वक्तव्य धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने आहे. भाजपने त्यांना बडतर्फ करावे आणि तुरुंगात पाठवावे. यामुळे जगाला संदेश जाईल की भारत कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष सहन करत नाही.