आसामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा 'भारत जोडो न्याय यात्रे'वर हल्ला'; राहुल गांधींना बसमध्ये हलवले: काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

हा हल्ला निःसंशयपणे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी केला आहे. मात्र, आम्ही घाबरलो नाही. आम्ही संघर्ष करत राहू, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
आसामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा 'भारत जोडो न्याय यात्रे'वर हल्ला'; राहुल गांधींना बसमध्ये हलवले: काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये आहे. शुक्रवारी रात्री लखीमपूरमध्ये भाजपच्या गुंडांनी यात्रेवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला होता. आता आसामध्ये पुन्हा काँग्रेसची यात्रा आणि भाजपचा झेंडा असलेले लोक आमने सामने आल्याचे दिसून आले आहे. यावेळी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्या वाहनावर आणि यात्रा कव्हर करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला केला आहे. हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी यांना बसमध्ये हलवण्यात आले. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जयराम रमेश यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सोनीतपूरच्या जुमुगुरीहाट येथे माझ्या वाहनावर भाजपच्या जमावाने हल्ला केला. त्यांनी वाहनावर लावलेले 'भारत जोडो न्याय यात्रे'चे स्टिटकरही फाडले. त्यांनी पाणी फेकले आणि घोषणा दिल्या. पण, आम्ही संयम ठेवला, गुंडांना हात दाखवला आणि वेगाने पुढे निघालो." तसेच, त्यांनी हा हल्ला निःसंशयपणे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी केल्याचे सांगितले. मात्र, आम्ही घाबरलो नाही. आम्ही संघर्ष करत राहू, असेही ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे.

"या गुंडांच्या हातात भाजपचा झेंडा होता. ही घटना थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या यशाने भाजपची झोप उडाली आहे. ते घाबरले आहेत. यामुळेच त्यांनी अशा भ्याड कृत्यांचा अवलंब केला आहे. पण, यांना आम्ही घाबरत नाही. हा प्रवास कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. 'भारत जोडो न्याय यात्रा' न्याय हक्क मिळेपर्यंत सुरूच आहे", असे काँग्रेसने आपल्या 'एक्स'पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधींना बसमध्ये हलवले-

काँग्रेसची यात्रा आणि भाजपचा झेंडा असलेला जमाव आमने-सामने आले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरक्षा रक्षकांनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या बसमध्ये हलवले. कारण, राहुल गांधी अगदी जमावच्या आत होते. या गर्दीत भाजपचे झेंडे असलेले लोक होते.

मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश-

या घटनेनंतर मुख्यमंत्री सरमा यांनी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांची 'एक्स'पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना मेन्शन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in