
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) आशिषकुमार चौहान यांनी मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारला, अशी माहिती एनएसईच्या प्रवक्त्याने दिली. तत्पूर्वी, त्यांनी बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.
आशिषकुमार चौहान हे एनएसईच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. परंतु त्यांनी २००० मध्ये एनएसई सोडले आणि रिलायन्स उद्योग समूहात सामील झाले. त्यानंतर ते पुन्हा २००९ मध्ये बीएसईचे डेप्युटी सीईओ बनले. २०१२ मध्ये त्यांनी बीएसईचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. चौहान यांच्या राजीनाम्यानंतर बीएसईने आपल्या नवीन प्रमुखाचा शोध सुरू केला आहे.
दुसरीकडे, बीएसईच्या बोर्डाने मध्यंतरी एक्स्चेंजचे काम चालवण्यासाठी एक कार्यकारी व्यवस्थापन तयार केले आहे, जे नवीन एमडी आणि सीईओची नियुक्ती होईपर्यंत बीएसईचे कामकाज पाहतील. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने नियामक फाइलिंग दरम्यान ही माहिती दिली आहे.
बीएसईचे काम पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी व्यवस्थापन समितीमध्ये बीएसईचे मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठ, मुख्य वित्त अधिकारी नयन मेहता, मुख्य माहिती अधिकारी केर्सी तेवाडिया, मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील आणि फ ट्रेडिंग ऑपरेशंस एंड लिस्टिंग सेल्स गिरीश जोशी यांचा समावेश आहे.
आशिषकुमार चौहान यांना २५ जुलै २०२२ पासून बीएसईच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. चौहान बीएसईचे बाजारमूल्य वाढवण्यासाठी आणि जगातील सर्वात वेगवान एक्सचेंज बनवण्यासाठी ओळखले जातात.