अशोक चव्हाण भाजपमध्ये; काँग्रेसचे नुकसान केले नाही -चव्हाण

भाजपला विरोध करता करता आपण देशाच्या विकासाला कधी विरोध करू लागलो, याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही.
अशोक चव्हाण भाजपमध्ये; काँग्रेसचे नुकसान केले नाही -चव्हाण

प्रतिनिधी/मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर केवळ चोवीस तासांतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या पक्षाने खूप काही दिले. मीही मोठे योगदान दिले आहे. मी पक्षाचे नेतृत्व केले आहे. मी पक्षाचे नुकसान केले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. भाजपमध्ये प्रामाणिक काम करेन. आगामी निवडणुकीत देशात आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळतील. पक्षाला माझ्या अनुभवाचा फायदा होईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही प्रवेश केला. भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘पक्ष सोडणे हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. तो घेणे कठीण होते. सध्या मी प्रवेश केला आहे. याव्यतिरिक्त अन्य कुणाला घ्यायचे, याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. राजकारणामध्ये मी नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन काम केले आहे. मी विरोधी पक्षात असताना आमच्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अन्य सहकाऱ्यांच्या काही तक्रारी असल्या तरी मला त्यांनी सहकार्यच केले आहे. मी ज्या पक्षात काम केले, ते प्रामाणिकपणे काम केले. तीच भूमिका घेऊन भाजपमध्येही प्रामाणिक काम करेन. आगामी निवडणुकीत देशात आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळतील. पक्षाला माझ्या अनुभवाचा फायदा होईल,’’ असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबद्दल अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘काही विरोधात बोलत आहेत, तर काही समर्थनार्थ बोलत आहेत. आमच्यात मतभिन्नता असली तरी मी व्यक्तिगत दोषारोप करणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला आहे. विकासाचे विविध पैलू आपण पाहत आहोत. आम्ही विरोधात असताना व्यक्तिगत टीका कधी केली नाही. यापुढे पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडेन आणि देवेंद्र फडणवीस सांगतील ते काम मी करेन,’’ असेही ते म्हणाले.

पक्षांतराचा निर्णय कठीण होता. त्यासाठी खूप विचार करावा लागला. माझ्या जिल्ह्याचा विचार करून आणि राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी मी हा निर्णय घेतला. माझ्या पक्षाने खूप काही दिले. मीही मोठे योगदान दिले आहे. मी पक्षाचे नेतृत्व केले आहे. मी पक्षाचे नुकसान केले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे,’’ असेही चव्हाण म्हणाले.

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज -देवेंद्र फडणवीस

भाजपला विरोध करता करता आपण देशाच्या विकासाला कधी विरोध करू लागलो, याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसला सांभाळता आले नाही. त्यांच्या पक्षात कुणाचा पायपोस कुणाला राहिला नाही. पक्ष कुठल्या दिशेने चालला आहे, हेच त्यांना कळत नाही. काही नेत्यांना आपले नेतृत्व काय करते, हेच कळत नाही. ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ते नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतर कोणते नेते प्रवेश करणार, या प्रश्नावर जमिनीशी जोडलेल्या नेत्यांना आमची दारे खुली असल्याचे फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in