

नवी दिल्ली : व्हाइस एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांची जागा घेतील. आशुतोष दीक्षित हे भारतीय वायुसेनेतील अत्यंत अनुभवी आणि प्रतिष्ठित अधिकारी आहेत. सध्या ते भारतीय वायुसेनेचे ५१ वे व्हाइस एअर चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांनी १ जुलै २०२६ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आता ते ३१ ऑक्टोबर रोजी नवा पदभार स्वीकारतील.
दीक्षित यांना ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळाले. ते नॅशनल डिफेन्स अकादमी, बांगलादेशातील डिफेन्स स्टाफ सर्व्हिस कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना ३,५०० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव आहे. ११ जून २०१९ रोजी ते एअर व्हाइस मार्शल, १ ऑक्टोबर २०२२ रोजी एअर मार्शल आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी कमांडर-इन-चीफ झाले. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये कॅडेट म्हणून नॅशनल डिफेन्स अकादमीच्या ६९व्या कोर्सचा आणि एअर कमोडोर म्हणून नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या ५७व्या कोर्सचा समावेश आहे.
एअर डिफेन्स कमांडर पदावर काम
दीक्षित यांनी १५ डिसेंबर २००३ ते १५ जानेवारी २००६ या कालावधीत ग्वाल्हेर येथील क्रमांक-९ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दिल्लीतील एअर हेडक्वार्टर्समध्ये प्रिन्सिपल डायरेक्टर, एअर स्टाफ रिक्वायरमेंट्स म्हणूनही काम केले. जानेवारी २०१८ ते मे २०१९ या कालावधीत त्यांनी एअर फोर्स स्टेशन बिदर येथे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी तिरुवनंतपुरममधील दक्षिण एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर म्हणून काम पाहिले.
असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ
ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या काळात ते एअर हेडक्वार्टर्समध्ये असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ, प्रोजेक्ट्स या पदावर होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या काळात त्यांनी असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ, प्लॅन्स म्हणून काम केले. एअर मार्शल पदावर असताना दीक्षित यांनी साऊथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये सीनियर एअर स्टाफ ऑफिसर, एअर हेडक्वार्टर्समध्ये डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ आणि अलाहाबाद येथील सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर मे २०२५ ते जून २०२६ या कालावधीत त्यांनी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू द चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी म्हणून काम केले. ‘ऑपरेशन सफेद सागर’, ‘ऑपरेशन रक्षक’, ‘कोप-इंडिया’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या मोहिमा आणि लष्करी सरावांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. त्यांनी भारतीय हवाई दलातील स्वदेशी एलसीए तेजस आणि इतर स्वदेशी विमान प्रकल्पांना पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.