आशिया-अमेरिकेचा महाखंड होणार

समुद्र नष्ट होणार : फक्त शेकडो दशलक्ष वर्षांची प्रतीक्षा
आशिया-अमेरिकेचा महाखंड होणार

नवी दिल्ली : पृथ्वीच्या भूगर्भात सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे अमेरिका आणि आशिया हे खंड युतीच्या मार्गावर असून, भविष्यात त्या दोन्हींचा मिळून एकत्रित महाखंड निर्माण होईल, असे भाकित भू-भौतिकशास्त्रज्ञ रॉस मिचेल यांनी द नेक्स्ट सुपरकाँटिनेंट नावाच्या पुस्तकात केले आहे. त्यासाठी फक्त शेकडो दशलक्ष वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

रॉस मिचेल यांनी पृथ्वीच्या लाखो वर्षांच्या भौगोलिक इतिहासाचा अभ्यास करून द नेक्स्ट सुपरकाँटिनेंट हे पुस्तक साकारले आहे. त्यात त्यांनी पृथ्वीच्या इतिहासात विविध कालखंडांमध्ये कोणते महाखंड अस्तित्वात होते, ते वेळोवेळी कसे विभक्त होत गेले आणि पुन्हा एकत्र येत आहेत, ही सर्व प्रक्रिया अत्यंत रोचक भाषेत मांडली आहे. त्यात भूतलावर डायनोसॉरच्या उगम आणि अस्तासारख्या अनेक रंजक कहाण्यांचा समावेश आहे. त्याला रॉस मिचेल यांच्या या विषयावरील अनेक वर्षांच्या अभ्यासाचा आधार आहे. पृथ्वीवरील अनेक ठिकाणांच्या भूगर्भीय नमुन्यांचा, खडकांच्या आणि जीवसृष्टीच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ही गृहितके मांडली आहेत.

आज पृथ्वीवर ढोबळपणे उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दोन अंटार्क्टिका असे खंड आहेत. ते आजच्या प्रमाणे नेहमीच स्वतंत्र नव्हते. साधारण २०० ते ३०० दशलक्ष वर्षांपूर्वी हे खंड पँजिया नावाच्या एकाच महाप्रचंड भूभागात एकत्रित स्वरूपात अस्तित्वात होते. आजचा आफ्रिका खंड त्याच्या केंद्रस्थानी होते. याच कालखंडात पृथ्वीवर भरगच्च जंगले होती आणि त्यात डायनोसॉर मुक्तपणे संचार करत होते.

त्याच्याही पूर्वी, म्हणजे साधारण एक अब्ज वर्षांपूर्वी, आजचा अमेरिका आणि ग्रीनलँड हे भूभाग एकत्र असलेला रोडिनिया नावाचा महाखंड अस्तित्वात होता. तो बराचसा उजाड-ओसाड स्वरूपाचा होता. त्याच्याही आधी, म्हणजे आजपासून २ अब्ज वर्षांपूर्वी कोलंबिया नावाचा महाखंड अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. महाखंडाचे विभक्त होणे आणि विविध खंड पुन्हा एकत्र येणे, ही प्रक्रिया पृथ्वीवर लाखो वर्षांपासून सुरू आहे. त्याचे कोडे उलगडणे हे मानवापुढील एक आव्हान आहे. मिचेल यांनी त्यादृष्टीने काही प्रयत्न केले आहेत.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आवरण थंड झालेल्या लाव्हारसापासून बनले आहे. त्याच्या खालील आवरण अद्याप पूर्णपणे थंड झालेले नाही. तेथे लाव्हारसाची घन आणि द्रव यांच्या मधली अवस्था आहे. त्या भागावर वरील आवरणाचे तुकडे, म्हणजे विविध खंड फिरत असतात. त्याला प्लेट टेक्टॉनिक आणि काँटिनेंटल ड्रिफ्ट म्हणतात. पृथ्वीच्या मध्यभागातील आवरणात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा वरील खंडांचे भूभाग थंड भागाकडे प्रवास करतात. त्यातून या हालचाली होत असतात, असे रॉस मिचेल यांनी पुस्तकात म्हटले आहे.

या हालचालींमधूनच भविष्यात अमेरिका आणि युरोशिया हे भूभाग एकत्र येतील. त्याने आजचा उत्तर ध्रुवावरचा समुद्र व्यापला जाईल, असे भाकित मिचेल यांनी वर्तवले आहे. तसेच या महाखंडाला अमेरिका आणि आशिया यांच्या संयोगातून अमेशिया असे नावही सुचवले आहे. अर्थात, ही युती प्रत्यक्ष अवतरण्यास अद्याप शेकडो दशलक्ष वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in