आसाम-मेघालयचा सीमावाद चिघळला गोळीबार; ६ जण ठार 

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच करार झाला होता. त्यात दोन्ही राज्यांतील ७० टक्के वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता
आसाम-मेघालयचा सीमावाद चिघळला गोळीबार; ६ जण ठार 

ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या दोन राज्यांमधील सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. याच वादातून झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये ५ नागरिक मेघालयचे आहेत, तर एका वनरक्षकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच करार झाला होता. त्यात दोन्ही राज्यांतील ७० टक्के वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या या हिंसक घटनेमुळे दोन्ही राज्यांत कमालीचा तणाव निर्माण झाला असून, मेघालय सरकारने ७ जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट बंदी लागू केली आहे.

आसाम वन विभागाकडून मेघालय सीमेवर गस्त घालण्यात येत होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवैधरीत्या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला वनरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक न थांबता पुढे गेल्याने आसामच्या वनरक्षकांनी ट्रकच्या चाकांवर गोळीबार केला. यानंतर ट्रकमधील तीन जणांना अटक करण्यात आले, तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून आसाम पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. त्यावेळी मेघालयातील लोक शस्त्रांसह त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी अटक करण्यात आलेल्या लोकांना सोडण्याची मागणी करत पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मेघालयमधील ५ नागरिक आणि एका वनरक्षकाचा समावेश आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. मुख्यमंत्री संगमा यांनी वेस्ट जैतिया हिल्स, ईस्ट जैतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, री-भोई, ईस्टर्न वेस्ट काशी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि साऊथ वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील इंटरनेट पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आसाम-मेघालयच्या मुख्यमंत्र्यांसोबत २९ मार्च २०२२ रोजी एक बैठक झाली होती. त्यात दोन्ही राज्यांतील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी करार करण्यात आला होता. अमित शहा यांनी त्यावेळी आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावाद ७० टक्के संपल्याचे म्हटले होते. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही आम्ही चर्चेतून वाद मिटवू, अशी माहिती दिली होती. याशिवाय दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in