

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी आसाममध्ये मतदार याद्यांचे ‘विशेष पुनर्विलोकन’ करण्याचे आदेश दिले असून अंतिम मतदार यादी १० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकनासाठी आसामच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जारी केलेल्या सूचनांनुसार, १ जानेवारी २०२६ ही पात्रतेची तारीख असेल.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विशेष पुनर्विलोकन वार्षिक विशेष संक्षिप्त पुनर्विलोकन आणि विशेष सखोल पुनर्विलोकन यांच्यामधील स्वरूपाचे आहे.
एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले, ‘हे विशेष संक्षिप्त पुनर्विलोकलन एक उन्नत रूप आहे.… मोजणी फॉर्मच्या ऐवजी बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) नोंदवहीत मतदारांची पडताळणी केली जाईल.’
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
‘एक्स’वर त्यांनी म्हटले की, ‘१ जानेवारी २०२६ ला पात्रता दिनांक मानून विशेष पुनर्विलोकन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आसाम सरकार स्वागत करते. यामुळे सर्व पात्र नागरिकांसाठी स्वच्छ, अद्ययावत आणि अचूक मतदार यादी तयार होण्यास मदत होईल. हे काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आसाम पूर्ण सहकार्य करेल.’
घरोघरी पडताळणीसाठी बीएलओना त्यांच्या भागातील विद्यमान मतदारांची माहिती असलेली पूर्व-भरलेली नोंदवही दिली जाईल. घराघर सर्वेक्षण करण्यासाठी घर म्हणजे मुलभूत एकक मानले जाईल आणि संबंधित माहिती मतदार किंवा कुटुंबप्रमुखाकडून पडताळून घेतली जाईल.
गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथे ‘एसआयआर’ करण्याचे आदेश दिले होते. यापैकी तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. आसाममध्येही पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अलीकडेच सांगितले होते, “आसाममध्ये एसआयआर करण्यासाठी विशेष आदेश जारी केला जाईल. नागरिकत्व कायद्यानुसार आसाममध्ये स्वतंत्र तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नागरिकत्व पडताळणीची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. २४ जूनचा ‘एसआयआर’ आदेश संपूर्ण देशासाठी होता. अशा परिस्थितीत तो आसामला लागू झाला नसता.”
असे आहे वेळापत्रक
घरोघरी पडताळणी : २२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर
एकत्रित मसुदा मतदार यादी : २७ डिसेंबर
अंतिम मतदार यादी : १० फेब्रुवारी २०२६