Assembly Elections 2026 : आसाम, केरळम विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान

आसाम आणि केरळ तसेच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान झाले.
Assembly Elections 2026 : आसाम, केरळम विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान
Assembly Elections 2026 : आसाम, केरळम विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान
Published on

नवी दिल्ली : आसाम आणि केरळ तसेच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आसाममध्ये ८५.६४ टक्के, केरळममध्ये ७८.०० टक्के आणि पुद्दुचेरीमध्ये ८९.८७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. विधानसभेच्या एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात आसाममधील १२६ जागांसाठी मतदान होत आहेत, तर केरळमधील १४० जागांसाठी आणि पुद्दुचेरीमधील ३० जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमधील मतांची मोजणी ४ मे रोजी होणार आहे.

केरळमध्ये ८८३ उमेदवार रिंगणात

केरळमध्ये १४० मतदारसंघांत ८८३ उमेदवार रिंगणात आहेत. तर २.६ कोटींहून अधिक मतदार आहेत. सुरक्षित आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एकूण ३०,४७१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये ११९ लॉजिस्टिक आणि मतदान यंत्र वितरण केंद्रांचा, तसेच ४१ मतमोजणी केंद्रांचा समावेश आहे. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ, विरोधी यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

आसाममध्ये ७२२ उमेदवार रिंगणात

आसाममध्ये १२६ सदस्यांच्या विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास २.५ कोटींहून अधिक मतदार पात्र आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात ७२२ उमेदवार उभे आहेत. याव्यतिरिक्त, 'तृतीयपंथी' श्रेणीतील ३१८ मतदार आणि ६३,४२३ 'सेवा मतदार' आहेत. सर्व ३१,४९० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' आघाडीचा सामना करण्यासाठी काँग्रेसने सहा पक्षांची युती केली आहे. तर आसाममध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात लढत आहे.

पुदुच्चेरीत २०९ मतदान केंद्रे 'संवेदनशील'

पुदुच्चेरीमध्ये ३० सदस्यांची विधानसभा निवडण्यासाठी १०,१४,०७० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पात्र आहेत. १,०९९ मतदान केंद्रांवर ११० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी २०९ मतदान केंद्रे 'संवेदनशील' म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर ड्रोनच्या सहाय्याने तसेच १,०९९ मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या ११० क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात आले. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस-डीएमके आघाडी यांच्यात लढत आहे. अभिनेता विजयचा तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) ही लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न करत आहे. या विधानसभेचा कार्यकाळ १५ जून रोजी संपणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in