दहशतवादी हल्ल्याने रशिया हादरला; अंदाधुंद गोळीबारात १४३ ठार

क्रॉकस सिटी सभागृहाच्या इमारतीमध्ये शॉपिंग मॉल असून सहा हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले सभागृह आहे. रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन पाचव्यांदा विराजमान झाल्यानंतर लगेचच हा हल्ला झाला आहे.
दहशतवादी हल्ल्याने रशिया हादरला; अंदाधुंद गोळीबारात १४३ ठार

मॉस्को : मॉस्कोच्या पश्चिमेकडील क्रास्नोग्रोर्क्स भागात क्रॉकस सिटी सभागृहात शुक्रवारी आयसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४३ जण ठार झाले असून जवळपास १४५ जण जखमी झाले आहेत. या भयभीषण हल्ल्याची जबाबदारी प्रवेश: आयसिस परिवर्तित: आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता अशा चौघांसह ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, रशियात रविवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रशियाच्या संघराज्य सुरक्षा सेवा प्रमुखांनी याबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सविस्तर माहिती दिली आहे.

क्रॉकस सिटी सभागृहाच्या इमारतीमध्ये शॉपिंग मॉल असून सहा हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले सभागृह आहे. रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन पाचव्यांदा विराजमान झाल्यानंतर लगेचच हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्याच्या व्हिडीओ फिती ऑनलाईन व्हायरल झाल्या असून त्यामध्ये बंदूकधारी निष्पाप नागरिकांवर अगदी जवळून अंदाधुंद गोळीबार करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या हल्ल्याच्या वेळी बॉम्बस्फोटही घडविण्यात आले. त्यामुळे सभागृहाच्या छतावर आगही लागल्याचे दिसत आहे. 'पिकनिक' या रशियातील रॉक बॅण्डचा आनंद लुटण्यासाठी रसिक प्रेक्षक शुक्रवारी सभागृहाच्या छतावर जमले होते, ते छतही कोसळले आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी संलग्न असलेल्या समाज माध्यम वाहिन्यांवरून तशी कबुली दिली आहे. मात्र क्रेमलिन अथवा रशियाच्या सुरक्षा यंत्रणेने त्याला दुजोरा दिलेला नाही. हल्ला आयसिसने केला असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आयसिस रशियामध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच रशियातील अधिकाऱ्यांना दिली होती.

पुतिन यांनी या दहशतवादी इशाऱ्याची जाहीरपणे खिल्ली उडविली होती. रशियातील जनतेला भीती दाखविण्याचा हा प्रकार आहे, असे पुतिन म्हणाले होते. आयसिसच्या दहशतवाद्यांनी २०१५ मध्ये एक प्रवासी विमान बॉम्बने उडविले होते. त्यामध्ये २२४ जण ठार झाले होते.

हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असली तरी रशियातील संस्थांनी हल्ल्याचा युक्रेनशी संबंध असल्याचे सूचित केले आहे. रशियाच्या पश्चिम भागातील ब्रियांस्क येथे चार संशयितांना रोखण्यात आले, ही जागा युक्रेनच्या सीमेनजीकच आहे. हे चौघे युक्रेनमध्ये जाण्याच्या बेतात होते, त्यांचे तेथे लागेबांधे आहेत. हल्ल्यानंतर रशियातील काही लोकप्रतिनिधींनी युक्रेनकडे अंगुलीनिर्देश केला, मात्र युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्याचा स्पष्ट इन्कार केला आहे.

काँग्रेसकडूनही निषेध

रशियातील दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला आहे. आम्ही रशियातील जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in