अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट; आयएसआयच्या संपर्कातील संशयिताला अटक

अयोध्येतील राम मंदिराला लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचणाऱ्या संशयित आरोपीला अटक करून गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) हा कट उधळून लावला.
अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट; आयएसआयच्या संपर्कातील संशयिताला अटक
X - @ConquerTheMind_, @ImAkhilesh007
Published on

फरीदाबाद : अयोध्येतील राम मंदिराला लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचणाऱ्या संशयित आरोपीला अटक करून गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) हा कट उधळून लावला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील रहिवासी अब्दुल रहमान (१९) या संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर फरीदाबाद येथून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. फरीदाबादमधील सुरक्षा यंत्रणांनी सदर बॉम्ब निकामी केले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान हा पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) संपर्कात असावा आणि त्याचे अनेक कट्टरपंथी संघटनांशी संबंध असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. संशयित आरोपी फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवत होता आणि रिक्षा चालविण्याचे कामही करायचा. मंदिराला लक्ष्य करण्यासाठी त्याने अनेकदा राम मंदिराची रेकी केली होती, तसेच आयएसआयला महत्त्वाची माहितीही पुरविली, असा आरोप केला जात आहे. तो फरीदाबाद ते फैजाबाद असा रेल्वेने प्रवास करणार असल्याचे समजल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.

दोन हँड ग्रेनेड जप्त

फरीदाबाद येथे हँडलरकडून बॉम्ब घेतल्यानंतर रेहमान पुन्हा अयोध्येत येणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. केंद्रीय यंत्रणेच्या माहितीनंतर गुजरात एटीएस आणि फरीदाबाद एसटीएफ यांनी ही संयुक्त कारवाई केली. चौकशीदरम्यान रेहमानने फरीदाबाद येथे शस्त्रास्त्र लपवून ठेवल्याचे सांगितले. या माहितीनंतर पोलिसांनी पाली परिसरातील पडक्या घराची झडती घेतली, तिथे चार तासांच्या शोधानंतर दोन हँड ग्रेनेड सापडले.

रविवारी अब्दुल रेहमानला अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुजरातला नेण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडून चिथावणीखोर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यावरून कट्टरपंथी संघटनांशी असलेले त्याचे संबंध उघड करण्यास मदत होऊ शकते. अब्दुल रेहमानच्या अटकेमुळे आएसआयच्या पाठिंब्यावर उभी राहिलेली एक मोठी दहशतवादाची साखळी हाती लागू शकते, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in